सीबीएसई, आयसीएसईच्या अंतर्गत गुणांना कात्री का लावता?

सामना ऑनलाईन । मुंबई

केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश द्यावा, अशी सूचना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीतून पुढे आली. या सूचनेनंतर दहावीच्या अंतर्गत गुणांचा वाद अधिकच चिघळला आहे. तोंडी परीक्षा नसल्यामुळे टक्केवारी खालावलेले एसएससीचे विद्यार्थी अकरावी प्रवेशात मागे पडतील या भीतीने इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांना कात्री लावणे योग्य आहे का, असा सवाल मुख्याध्यापक तसेच पालक करीत आहेत. हा निर्णय झाल्यास ‘इंडिया वाइड पॅरेंटस् असोसिएशन’ने न्यायालयाचे दार ठोठावण्याचा इशारा दिला आहे.

इतर केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदा एसएससीच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे अकरावीत नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यात हे विद्यार्थी मागे पडतील अशी भीती व्यक्त होत असून प्रवेशाचा हा तिढा सोडविण्यासाठी अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे फक्त लेखी परीक्षेतील गुण ग्राह्य धरण्याचे धोरण ठरविले जात आहे. निकालानंतर प्रवेशाचे धोरण ठरविणे कितपत योग्य आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर गुणांमधील बदल स्वीकारणे विद्यार्थी-पालकांना सोपे जाईल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाला सीबीएसईच्या पालकांचे निवेदन
अंतर्गत गुणांबाबत शिक्षणमंत्र्यांची झालेली चर्चा ही असंवैधानिक असून विद्यार्थीविरोधी आहे. याप्रकरणी आम्ही मनुष्यबळ विकास मंत्रालयाला निवेदन देणार आहोत. सीबीएसई बोर्डाचे नियम हे देशभरात एकच असतात. त्यामुळे एकट्या महाराष्ट्रात ते बदलता येणार नाही. उलट राज्य सरकारने एसएससीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यायला हवा. प्रवेशाचा तिढा सोडविण्यासाठी इतर विद्यार्थ्यांचे गुण कमी करण्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचे 20 गुण द्यावे. – अनुभा सहाय, सदस्या, इंडिया वाइड पॅरेंटस् असोसिएशन

आपली प्रतिक्रिया द्या