चोर म्हणाला ‘प्लीज दागिने दे’; दुकानदाराने केली धुलाई

एका ज्वेलरीच्या दुकानात चोरी करण्यासाठी आलेल्या चोराला चोरीचा प्रयत्न महागात पडला आहे. दुकानात हातसफाई करून ऐवज लांबवण्याऐवजी दुकानदाराने बेसबॉलच्या बॅटने चोराची धुलाई करत हात साफ करून घेतले. दुकानदाराची आक्रमकता पाहून चोराने गोळीबार करत दुकानातून पळ काढला आहे. ही घटना पंजाबच्या मोंगा शहरात घडली आहे.

मोंगा शहरातील मुख्य बाजारपेठेत कुलवंत सदियोडा यांचे सदियोडा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दुकानात खरेदीच्या बहाण्याने गुरुवारी एक चोर शिरला. त्याने देशी कट्ट्याचा धाक दाखवत चोरीचा प्रयत्न केला, असे कुलवंत सदियोडा यांनी सांगितले. आपण दुकानात असताना गुरुवारी कडे घेण्याच्या बहाण्याने चोर दुकानात शिरला. काही वस्तू पाहिल्यावर त्याने त्याच्याकडील देशी कट्टा काढला आणि त्याचा धाक दाखवत सर्व ज्वेलरी दे, अशी धमकी दिली.

तो चोर मला म्हणाला’ प्लीज मला दुकानातील सर्व ज्वेलरी दे, नाइलाजस्ताव मला चोरी करावी लागत आहे.’ त्यावर आपण त्याला म्हणालो माझाही नाइलाज आहे. माझी मेहनतीची कमाई आहे, ती मी देणार नाही. त्यावर चोर म्हणाला नाइलाजाने मला गोळी चालवावी लागेल. मी म्हणालो, चालव गोळी, जीव गेला तरी मी ज्वेलरी देणार नाही. त्यानंतर त्याने गोळी चालवण्याचा प्रयत्न केल्याने आपण बाजूला हटलो आणि संधी साधत त्याने दुकानातील ज्वेलरी गोळा करण्यास सुरुवात केली.

त्याच्या हालचालींकडे माझे लक्ष होते. आपल्या डोळ्यासमोर दुकानाची लूट होताना बघावे लागत होते. ही लूट थांबवण्याचा निर्धार करून आपण धैर्य एकवटले. चोरट्याची नजर चुकवत दुकानाच्या एका कोपऱ्यात ठेवलेली बेसबॉलची बॅट हातात घेतली आणि सर्व शक्ती एकवटून चोरट्यावर आपण तुटून पडलो, असे सदियोडा यांनी सांगितले. चोराने घेतलेली सर्व ज्वेलरी सोडेपर्यंत आपण त्याची धुलाई केल्याचे सदियोडा यांनी सांगितले.

धैर्य एकवटून आपण प्रतिकार करत असल्याने चोरटा भांबावला. आपली आक्रमकता पाहून त्याने ज्वेलरी सोडून दिली आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी देशी कट्ट्याने गोळीबार करत त्याने पळ काढल्याचे सदियोडा यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीमध्ये दुकानातील सर्व घटना कैद झाली असून चोरट्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदियोडा यांनी दाखवलेल्या धाडसाचे पोलिसांनीही कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या