श्वेता तिवारीने प्रसिद्ध केली हादरवणारी सीसीटीव्ही दृश्ये, बॉलीवूडवाले अभिनेत्रीच्या पाठीशी एकवटले

टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा नवरा अभिनव कोहली यांच्यातील वाकयुद्ध दिवसेंदिवस स्फोटक होत चाललं आहे. श्वेता तिवारी ही खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये आहेत. तिथून तिने दोन व्हिडीओ प्रसिद्ध केले असून यातील एक सीसीटीव्हीची दृश्ये आहेत. ही दृश्ये पाहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडतो आहे.

श्वेता आणि तिचा पती अभिनव यांच्यात बिनसलं असून दोघे वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत. अभिनवने श्वेता तिवारीवर त्यांचा मुलगा रेयांश याच्यावरून गंभीर आरोप केले होते. अभिनवच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी म्हणून श्वेताने हे व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत.

श्वेताने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओंमध्ये एक सीसीटीव्हीचं दृश्य आहे. यामध्ये श्वेताने तिचा मुलगा रेयांशला कडेवर घेतलेलं दिसत असून अभिनव तिच्या हातातून मुलाला खेचून घेण्यासाठी बळजबरी करत असल्याचं दिसतंय. या प्रयत्नात श्वेता तिवारी जमिनीवर पडते तरीही अभिनव तिच्या हातातून मुलाला खेचून घेण्यासाठीचे प्रयत्न सोडत नाही असं पाहायला मिळतंय. हा सगळा प्रकार दोन महिला घाबरून लांबूनच पाहात असतानाही दिसून आलं आहे. नवऱ्याच्या छळामुळे आपला मुलगा जाम घाबरला असल्याचं श्वेता तिवारीचं म्हणणं आहे.

श्वेताने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडीओनंतर बॉलीवूड कलाकार तिच्या पाठीशी एकवटायला लागले आहेत. निर्माती एकता कपूरने प्रश्न विचारलाय की ‘या माणसाला अजून अटक कशी झाली नाही’ तर अभिनेत्री किश्वर मर्चंटने म्हटलंय की ‘हे भगवान!इतकं सगळं घडत असताना लोकं नुसती उभी राहून पाहात आहेत’ अभिनेता करणवीर बोहराने ‘मी ही दृश्ये पाहूच पाहूच शकत नाही, हे अमानवीय असून तू ताबडतोब पोलिसांत तक्रार करायला हवी असं म्हटलं आहे.’ श्वेताने हा व्हिडीओ आपण काही काळानंतर डिलीट करणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. लोकांना अभिनवचं खरं रुप कळावं यासाठी मी हा व्हिडीओ प्रसिद्ध केल्याचं तिने म्हटलं आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी हिने तिचा पती अभिनेता अभिनव कोहली याच्याविरुद्ध काही काळापूर्वी तक्रार दाखल केली होती. आपली मुलगी पलक हिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तिने केला होता. श्वेताने केलेले हे आरोप खरे असल्याचं तिची मैत्रीण अनुराधा सरीन हिने म्हटलं होतं. आपल्या मुलीशी अभिनव हा नीट वागत नव्हता, तिच्यासोबत तो घाणेरडं बोलत राहाचा असं श्वेताने म्हटलं आहे. श्वेताची मुलगी पलक हिने एक इन्स्टाग्राम पोस्ट टाकली होती, ज्यात तिने म्हटलं होतं की अभिनव माझ्याशी ज्या पद्धतीने बोलायचा ते ऐकून कुठल्याही मुलीला वडिलांबद्दल लाज वाटली असती. श्वेताची मैत्रीण अनुराधाने म्हटलंय की अभिनव हा श्वेताची मुलगी पलक हिला तिच्या कौमार्याविषयी विचारायचा. तो पलकला तिच्या खासगी आयुष्याविषयी घाणेरडे प्रश्न विचारायचा आणि विचित्र फोटो दाखवून तिला त्याप्रमाणे वागायला सांगायता. 2017 साली अभिनवने पलकला ‘तू गरोदर आहेस का’ असा प्रश्न विचारला होता असंही अनुराधाने म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या