जेएनपीटीवर ७१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

अंतर्गत घडामोडीही टिपणार, गैरकारभाराला पायबंद

सामना ऑनलसाईन । उरण

हिंदुस्थानातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या जेएनपीटी बंदरावर ७१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे जेएनपीटीची सुरक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आता कडेकोट झाली असून या कॅमेऱ्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. जेएनपीटीतील सर्व कारभारावर आता ‘वॉच’ राहणार असून कंट्रोल रूममधून या सीसीटीव्ही कॅमेऱयांचे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

जेएनपीटीमध्ये रोज विविध देशांमधून असंख्य कंटेनर्स येत असतात. अनेकदा चोरीचेदेखील प्रकार घडले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱयांमुळे आता या घटनांना पायबंद बसणार आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले. जेएनपीटी भागातील पॅरॅमीटर रस्ते, बंदर, जीटीआय टर्मिनल, बर्थ, लॅण्डिंग जेट्टी, सेंट्रल गेट, साऊथ गेट, नार्थ गेट, कंट्रोल रूम आदी महत्त्वाच्या ठिकाणांवर कॅमेऱ्यांचा वॉच राहील.

पीटीझेड, वायफाय व थर्मल

बंदरातील बारीकसारीक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी पीटीझेड कॅमेरा, पीटीझेड वायफाय, पीटीझेड थर्मल आदी अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जेएनपीटी बंदराचा अंतर्गत आणि बाह्य परिसर सुरक्षित राहावा यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जात असून सीसीटीव्ही कॅमेरा प्रणालीमुळे मोठी मदत होईल, असे जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या