प्रेमाचा रंग… खाऊचा ढंग…

279

मेघना लिमये

सणउत्सव म्हणजे आनंदआनंद व्यक्त करण्याचा मार्ग नेहमी रसवंती पुरवितेपाहूया गोडचटपटीत पाककृती

टॅकोज कोन्स

साहित्य.. टॅकोज कोन्ससाठी १ वाटी गव्हाचे चाळलेले पीठ, अर्धा वाटी मैदा, पाव वाटी तांदूळ पीठ, १ ते दीड चमचा तेल, सारणासाठी १ वाटी शिजविलेले छोले (छोल्याचा वाटाणा), ३-४ चमचे शेजवान चटणी, लसूण, १ चमचा रेड चिली पेस्ट, किसलेले चीज, बारीक उभा चिरलेला कोबी, गाजर, लेटय़ूसची पानं, चवीनुसार मीठ.

कृती.. गव्हाचे पीठ, मैदा व तांदूळ पीठ एकत्र करून त्यात कडकडीत मोहन घालावे. थोडेसे मीठ घालून पाणी घालून मळून घ्यावे.

मळलेल्या पिठाचे थोडे मोठे गोळे करावेत. कोरडा मैदा लावून पोळी लाटावी. ८ ते १० इंच लाटलेल्या पोळीचा गोल कापून घ्यावा. काटय़ाने टोचे मारावेत. चार चतकोरात कापून घ्याव्यात. चतकोराला कोनाचा आकार द्यावा. तेल तापेसतोवर कोन सुकू द्यावेत. तेल गरम करून कोन तळून घ्यावेत. स्टफिंगसाठी एका कढईत थोडेसे तेल गरम करून त्यात थोडासा लसूण परतून घ्यावा. शिजविलेला वाटाणा थोडासा अर्धबोबडा करावा. त्यात शेजवान चटणी, रेड चिली पेस्ट घालावी. चवीनुसार मीठ घालावे व एक वाफ येऊ द्यावी. वरील स्टफिंग थोडे थंड झाले की, कोन्समध्ये भरावेत. त्यावर कोबी, गाजर, लेटय़ूस घालावे व किसलेले चीज पसरवावे. लगेच सर्व्ह करावे.

तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असं भाऊ-बहिणीच्या नात्याला म्हटलं जातं. एकमेकांमधील राग, रुसवे दूर सारून त्यांना कायस्वरूपी प्रेमाच्या बंधनात बांधणारा आणि त्यांच्या नात्याची दृढता राखणारा सण म्हणजे रक्षाबंधन. दोघांच्या नात्यामागची पवित्रता, कृतज्ञता या दिवशी जपली जाते. भाऊ नसणारी स्त्री चांदोबाला भाऊ मानून ओवाळते. या सणाचे वैशिष्टय़ म्हणजे कोणतीही स्त्री वयाने कितीही मोठी झाली तरी रक्षाबंधनाच्या सणानिमित्त तिला माहेरची ओढ लागतेच.

रक्षाबंधनानिमित्त घरी गोडधोड पदार्थ  हे  झालेच पाहिजेत. पूर्वापार सर्वत्र घरी नारळीभात, साखरभात तसेच नारळीच्या वडय़ा बनविल्या जात. पण हल्ली सर्वांना काहीतरी नवीन पदार्थ खायची आवड निर्माण झाली आहे. घरोघरी गोडधोड पदार्थ तर बनातातच, पण आठवडय़ाची सुटी असेल तर एखादं रिसॉर्ट बुक करून किंवा पिकनिक काढून सण साजरा होतो. सर्वांना एकत्र आणणारी ही एक नवीन रीतच . यावेळी काढलेले फोटो, ग्रुप फोटो, सेल्फी आणि व्हिडीओ चित्रीकरणाच्या आठवणी एकमेकांना सांगितल्या जातात, व्हॉटस् ऍपद्वारे पाठवल्या जातात. तरुण मंडळी ही कामे आपल्या खांद्यावर आनंदाने पेलतात.  असा हा सण रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देऊन जातो. आपल्या देशात प्रेम, आपुलकी  कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आजही कायम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या