कश्मीरमध्ये 15 ऑगस्ट धुमधडाक्यात साजरा करा! अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा संदेश

558
munir-khan-adgp-jk

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरसाठीचे कलम 370 हटवल्यानंतर यंदाचा स्वातंत्र्यदिन अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. जम्मू-कश्मीरमध्ये 15 ऑगस्ट साजरे करताना कलम 370 चा आधार घेत अडथळे आणले जायचे, विरोध केला जायचा. आता मात्र कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये हा स्वातंत्र्यदिन अगदी धुमधडाक्यात (दबाके मनाओ) साजरा करा, असा संदेश जम्मू-कश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी दिला तिथल्या नागरिकांना दिला आहे.

कलम 370 हटवल्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अत्यंत चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या संदर्भात अतिरिक्त पोलीस महासंचालक मुनीर खान यांना प्रश्न विचारले असता, ‘सगळीकडे शांतता आहे, सर्व यंत्रणा जागच्या जागी आणि तयार आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये अत्यंत चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे’, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जम्मू-कश्मीरमध्ये सोमवारी बकरी ईद अगदी शांततेत साजरी करण्यात आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली होती. नागरिकांना बकरी ईद सण साजरा करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी घरपोच पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या