पाजपंढरीत नारळी पौर्णिमा उत्सवाला आले उधाण; मच्छिमार कोळी बांधवांकडून पारंपरिक संस्कृतीचे अनोखे दर्शन

जीवावर ज्याचे मारताव मौजा…., पोसतोय जो घरा दाराला…, नारळी पुनवला गोमू नारळ सोन्याचा देऊया दर्या सागराला…, करी विनवनी आज या समिंदराला…, नाखवा नाखवीन जोरीला…, सरू दे दुष्काळ औंदा म्हावऱ्याचं धन दर्याचं येऊ दे होरीला…, नारळी पुनवला गोमू देऊया नारळ सोन्याचा दर्या सागराला, अशा सारख्या एकापेक्षा एक पारंपरिक कोळीगीतांच्या ठेक्यावर ताल धरत पाज पंढरीतील मच्छिमार कोळी समाज बंधु-भगिनींनी समुद्राला शांत होण्यासाठी नारळी पौर्णिमेला गुरुवारी नारळ अर्पण केला. तेव्हा प्रत्यक्ष हिंदु संस्कृतीतील पारंपारिक कोळी संस्कृतीचे खरे दर्शन या निमित्ताने अनेकांना ऑंखो देखा हाल पाहता आले, असा हा डोळ्यांचा पारणे फेडणारा अनोखा सोहळा दापोली तालुक्यातील पाज पंढरी या गावात पाहावयास मिळाला.

रत्नागिरी जिल्हयातील सर्वात मोठ्या मच्छिमार कोळी समाज लोकवस्तीचे गाव दापोली तालूक्यात पाजपंढरी हे गाव आहे. या गावातील लोकांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रभू श्रीरामाच्या आशिर्वादाने या गावाच्या ऐकीचे ऐक्य अनोखे असेच आहे. अशा या पाजपंढरी गावात नारळी पौर्णिमेच्या दिवशी रुमाल कमरेला बांधलेली पुरुष मंडळी व नऊवारी साड्याा नेसलेल्या, सोन्याच्या दागदागिन्यांनी मढलेल्या कोळी भगिनी समिंदराच्या पूजेला जातानाचे दृष्य काही औरच होते.

1 आॅगस्टपासून अधिकृतपणे मासेमारी सुरू झाली, मात्र समुद्रातील वातावरण हे मासेमारीस पोषक नसल्याने शासनाची परवानगी मिळूनही गेले 10 दिवस उलटून गेले तरी अजूनही मासेमारांकडून मासेमारीला सुरुवातच करण्यात आलेली नाही, असे असले तरी दरवर्षी मासेमारीला समुद्रात जाण्याआधी त्यापूर्वी पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी सागराची विधिवत पूजा कोळी मच्छिमार बांधवांकडून केली जाते. समुद्राला शांत करण्यासाठी नारळ अर्पण केला जातो. ही अनेक वर्षांपासूनची पाजपंढरी गावाची परंपरा आहे. काळ बदलला तरी कोळी बांधवांनी ही परंपरा आजही त्याच श्रद्धेने पाजपंढरीने आपली परंपरा तशीच जोपासत अजून कायम ठेवली आहे.

पाजपंढरीतील कोळी बांधव दरवर्षी नारळीपौर्णिमेला बोटींची पूजा करतात. बोटींना पताका लावतात छान रंगरंगोटी करून बोटी सजवून मासेमारीसाठी बोटी समुद्रात लोटतात. संपूर्ण पाजपंढरी गावातून कोळी मच्छिमार बंधु भगिनी समाज बांधव हे आपला पारंपरीक कोळ्यांचा वेश परिधान करून मिरवणूक काढतात. त्यामध्ये थोरामोठ्यांपासून बच्चे कंपनीसह सगळेच वाजत गाजत मिरवणुकीने बंदरावर येतात. पारंपरिक कोळीगीते आणि वाद्याच्या साथीने या मिरवणुका निघतात. समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. सोन्याचा नारळ म्हणजे नारळाला सोनेरी कागदाचे वेष्टन लावून सजवलेला नारळ समुद्रात विधिवत सोडला जातो.

संपूर्ण कुटुंबाला मागे ठेवून कोळी बांधव भर समुद्रात मासेमारीला निघतो. त्यावेळी कोळी महिलांचा व्यवसाय हा सागरावरच अवलंबून असतो. समुद्राला ते देव मानतात. त्यामुळे कोळी महिलांच्या दृष्टीने या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त खास बनवलेल्या ओल्या नारळाच्या करंजांचा नैवद्य बोटीला आणि समुद्राला दाखवतात. समुद्राची यथासांग पूजा करतात. खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या आमच्या धन्याचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासोळी गावू दे… असे गाऱ्हाणे कोळी भगिनी समुद्राला घालतात.

पाजपंढरी गावातील यजमान गोरेवाले मंडळ, शेतवाडी मंडळ, तुरेवाले मंडळ, रस्ताले मंडळ, होमावाले मंडळ, जुनी कुलापकर मंडळ, नवीन कुलापकर मंडळ, विठाबाई मंडळ, वाडीवाले मंडळ, मधली आळी मंडळ या पाजपंढरी गावातील संपूर्ण दहा मंडळांसह श्रीराम हायस्कूल पाजपंढरी, जिल्हा परिषद मराठी शाळा पाजपंढरी आणि सर्व पाजपंढरी व हर्णे गावातील ग्रामस्थ यांनी नारळी पौर्णिमा उत्सव सोहळ्यास उपस्थित राहून उत्सव सोहळ्याची चांगलीच रंगत आणली.