तबल्याचे जादूगर उस्ताद अल्लारखा यांची जन्मशताब्दी, शंभर कलाकारांची अनोखी मानवंदना

ustad-allarakha

सामना प्रतिनिधी । मुंबई

तबल्याचे जादूगर उस्ताद अल्लारखा यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या 29 एप्रिलपासून सुरू होत आहे. यानिमित्त आघाडीचे शंभर कलाकार त्यांना अनोखी मानवंदना देणार आहेत. नरीमन पॉइंट येथील एनसीपीए येथे खास कार्यक्रम होणार आहे.

उस्ताद अल्लारखा यांचा जन्म जम्मू येथील एका छोटय़ाशा गावात झाला. त्यांनी देश-विदेशात तबल्याला एक स्वतंत्र वाद्य म्हणून ओळख मिळवून दिली. त्यांचे शिष्य त्यांना अब्बाजी या नावाने हाक मारत. सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांनी अनेक शिष्य घडवले. त्यांचे तीन सुपुत्र झाकीर हुसैन, फझल कुरेशी, तौफिक कुरेशी त्यांचा वारसा चालवत आहेत. उस्ताद अल्लारखा यांच्या स्मरणार्थ एनसीपीएच्या टाटा थिएटरमध्ये सकाळी 6.30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. शास्त्राrय संगीत, लोककला, जॅझ आणि फ्युजनचे कलाकार सहभागी होतील. गोदरेज थिएटरमध्ये व्हिडीओ सादरीकरण तर ओपन एअर प्लाझामध्ये समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.

तबल्याला जागतिक कीर्ती मिळवून दिली!

‘उस्ताद अल्लारखा अर्थातच सगळ्यांचे अब्बाजी हे आमच्यासारख्या कितीतरी कलाकारांचे शास्त्राrय संगीतातील प्रेरणास्थान आहेत. त्यांनी तबल्याला जागतिक कीर्ती मिळवून दिली. अब्बाजी हे कलाकार आणि माणूस म्हणूनही ते मोठे होते. त्यांची कला हेच त्यांचे जीवन होते. ते कायम संगीताच्या विचारातच असायचे. आज कोणत्याही कलाकाराला कार्यक्रमात गायन किंवा अन्य वाद्याला तबल्यावर साथसंगत करताना नक्कीच अब्बाजींची आठवण येत असणार. पुढील अनेक वर्ष हा कलाकार संगीत क्षेत्रातील प्रत्येक कलाकाराच्या मनावर अधिराज्य गाजवेल.’
– पंडित उदय भवाळकर, गायक