जिवलग… मिश्तू

अदिती सारंगधर

सोनाली खरेची मिश्ती…एक गोड… हळूवार नातं…

गेली अनेक वर्षे तश्शीच दिसणारी मराठी अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारला तर सोनाली खरे हे नाव अग्रणी आल्याशिवाय राहातच नाही. एकदम मेन्टेन्ड मम्मी… सुंदर, नृत्यांगना, उत्तम अभिनेत्री, अत्यंत प्रेमळ मैत्रीण आणि त्याहूनही अधिक बेस्ट आई… म्हणून मी ‘सोना’ला ओळखतेय. ट्रेन, बस, रिक्षा, गाडी… मग ड्रायव्हरवाली गाडी.. असा चढत्या क्रमाचा प्रवास… दोघींनीही एकत्र केल्यामुळे आमची ही मैत्री अधिकच घट्ट.

अगं कित्ती छान कल्पना आहे… आपण नक्की करूया ते भेट. या दरम्यान फक्त दोन दिवसांचा वेळ गेला. इतकी सोना आणि सनाया एक्सायटेड होते आणि त्यांच्याइतकीच आमची मिश्ती.

मिश्तू यायच्या आधी दोनवेळा आम्ही पिल्लं घरी आणली खरी, पण ती आमच्या घरात सेटच होत नव्हती. खूप खूप त्रास झाला होता त्यांना परत देताना… पण त्यानंतर सतत मला, सनाया आणि विजयला घरात अजून एकजण मिसिंग आहे असं वाटत होतं. कारण आम्हाला कुत्र्यांची प्रचंड आवड आहे. आणि सनायाला लागलेला लळा दिसत होता. तिचं थोडुसं सॅड असणं फील होत होतं… मग ठरवलं चला, हा शेवटचा प्रयत्न.

कळलं की कॉकर्स स्पॅनिअलची पिल्लं झालीयेत ओळखीच्या ठिकाणी. गेलो बघायला, पण घेऊन जाऊया अशी मात्र हिंमत होत नव्हती… पण एक पिल्लू सतत सतत बागडत आमच्याकडेच येत होतं. शेवटी निघालो तर समोर दरवाजात येऊन उभं राहिल्यावर वाटलं… नाही रे हे आपलंच बाळ आहे. आपल्यासाठीच थांबलं होतं… क्षणाचाही विचार न करता या गोड गोड गोळ्याला उचललं आणि गाडीत टाकलं… विजयला काय वाटलं कुणास ठाऊक पण त्याने ‘मिश्ती’ अशी हाक मारल्यावर टुकूर टुकूर त्याच्याकडे बघायला लागलं… बरं घरी सनायाला माहीतच नव्हतं असं काही होणारे…

डॅडीनी मला फोन करून सांगितलं की खूप व्हीआयपी गेस्ट येणार आहेत सना… तू रेडी होऊन बस. तुझ्या रूममध्ये बस बरं.. बेल वाजवल्यावर मी गेले तर वॉव वॉव वॉव वॉव… मिश्ती आली होती. मला खूप खूप खूप खूप आनंद झाला. तिला बघून… हे सगळं बोलत असताना सनायाचे मोठ्ठे झालेले डोळे आणि अगदी ताप असतानासुद्धा परत आलेली एनर्जी सगळं काही सांगून जात होती. बेडपाशी टकामका बघत बसलेली मिश्तीसुद्धा माझी दीदी माझं कौतुक करतेय असं समजून एकदम शेपूट हलवत नाचतच होती…

चला जेवायला… म्हटल्यावर मग धूम बाईंची…

‘चला जेवायला’ आणि ‘चला फिरायला’ हे दोन्ही तिचे आवडते शब्द. आणि आवडत्या कृतीही…

सकाळ दुपार आणि रात्री तिला खाली वॉकला घेऊन जावं लागतं. तशी छोटू ब्रीड (प्रजाती) असल्यामुळे वॉकर ठेवा वगैरे भानगड नाही. बऱयाचदा मी जाते… कारण तेवढाच थोडा वेळ एक्सक्लुजीव्हली तिचा असतो. तिच्यासाठीचा असतो. तिच्यामुळे मला मिळालेला असतो… आमच्या कंपाऊंडमधल्या सगळ्या छोटय़ा मुलांची ती फ्रेंड आहे. त्यामुळे तिच्या वॉकची वेळ झाली की सगळे खेळायला तय्यार… मग तिच्याबरोबर पकडापकडी, लपछपी असे सगळे खेळ ही मुलं खेळतात… आणि ‘बास… चला घरी अभ्यास करायचाय’ असं दटावून कशा आया मुलांना घरी बोलावतात तस्सं मिश्तीला ओरडून घरी बोलवावं लागतं. तिच्यामुळे सनाला पण मग तडी बसतेच… पण बाब्बा ताईला कुणी ओरडलं की… भू भू भू भू थांबतच नाही हिचं…

आपण आपल्या मुलांना देतोच ना वेळ, मग जेव्हा पेट्स घरी आणते तेव्हा ते पण आपलं बाळच असतं. त्यालाही वेळ द्यायलाच हवा ना… मुलं तरी काही काळानंतर बोलायला लागतात… दुखलं खुपलं सांगतात. पण ही बाळं सतत छोटीच असतात ना… आपण त्यांना पूर्णतः समजून घेणं आवश्यक असतं. अपेक्षित असतं… त्यांच्या नॉर्मल वागणुकीमध्ये थोडा जरी बदल झाला तर आपण लक्षात घ्यावं लागतं. भाषा नसली तरी आवाजातून किंवा बॉडी लँग्वेजमधून त्यांचं व्यक्त होणं लक्षात घ्यावं लागतं गं… एका मुलाची आई होणं थोडं सोप्पं आहे कदाचित, पण एका पेटची आई होणं कठीण आहे. खूप मोट्ठी जबाबदारी आहे. कारण इमोशनली, फिजिकली, शेवटपर्यंत त्यांच्यासाठी फक्त आपण असतो… त्यांना पंख नाही फुटत नी नाही जात आपल्याला सोडून…

तर… मी आमच्या घरातली गुड कॉप आहे. चूक केली की आईच्या पाठीशी… फटका वा ओरडा पडणार असला की वाचवायला आई… काचेचं सामान फोडलं की लपायला आईच… लाडात आलं, काही काम करून घ्यायचं असलं की आईची कुशी… असं सगळं करायला मी… आणि शहाणी ऐकायची कोणाचं तरी डॅडीचं… मी आपली शंभरवेळा एक गोष्ट सांगतेय, पण डॅडीचा एकदा आवाज आला की लग्गेच ऐकणार ही शहाणी… शिस्त लावायचं काम डॅडीचं आणि स्पॉईल करायचं काम मम्मा आणि सनायाचं…  राग येतो तिला… आमच्या गाडय़ा आल्या की धावत दरवाजापाशी येऊन उभी असते. आल्यावर आधी हिला उचलून घ्यायचं, मग घरात जायचं… दरवाजाची बेल वाजली की आलेल्या नवीन व्यक्तीचं आम्ही भुंकून स्वागत करतो आणि आमचं खेळणं धावत जाऊन त्याच्या हातात ठेवणार आणि ‘माझ्याशी खेळा ना..’ असं सांगणार… इतकी गोड… विनवणी असली की कोण नाही म्हणणार?

तीन वर्षांची झालीये मिश्ती… आणि आता आवडीनिवडी सुरू झाल्या. पण तरीही दामटवून फक्त चिकन पाया, भात अशा घरगुती पदार्थांचा मारा असतो. डॉग फूडवर आमचा विश्वासच नाही… आपण ऑर्गेनिक ऑर्गेनिक खायचं आणि तिला का रेडी टू इट… सो घरचं जेवण… कंपल्सरी तिलापण आणि सनायालापण…

इतक्यात बेल वाजली आणि दरवाजा उघडला तर मिश्ती घरातून खाली पळाली. आम्ही सगळे तिच्यामागे… बापरे एका गाडीमागे जाऊन लपली होती डांबरट…

अगं अस्संच एकदा दरवाजा उघडला तर भटक भवानी आमची खाली गेली. आम्ही तिच्यामागे… वॉचमन म्हणाला गेटमधून बाहेर गेली… आम्ही सगळे वेडय़ासारखे शोधतोय हिला. मनात वाईट वाईट विचार आले. मी तर रडायला लागले. घराजवळ एक चर्च आहे. तिथे गेलो तर चर्चच्या दारात प्रेयर्स ऐकत बसली होती ही शांतपणे… काय माहीत इथेच का येऊन थांबली. त्यानंतर मात्र नेहमी थोडातरी वेळ चर्चच्या दारात उभी राहाते त्या प्रेयर्स ऐकत… मागच्या जन्मी कॅथलिक होती बहुतेक… मला वाईट वाटलं. रडू आलं तर तोंडावर पंजा मारून पुसायचा प्रयत्न करते. अख्खं तोंड चाटून टाकते. मग तिचा हात हातात घेऊन तिला सांगितलं आय ऍम ओके की बरं वाटतं तिला… मग जाऊन तिच्या गादीवर बसते.

आत्तासुद्धा बघ ना आम्ही बाहेर गेलो की ४ दिवसांनंतर ना आम्हाला करमतं ना तिला… खरं तर माझ्या आईला कुत्री अज्जिबात आवडत नाहीत. पण आमच्या मिश्तीचं आणि आईचं मस्त जमतं… आई टीव्ही बघत असली की ही पण बाजूला जाऊन बसते… आणि आई परत यायला निघाली की रागावून टीव्हीचे रिमोट हातात आणून देते आणि सांगते आज्जी अजून राहा ना इथे प्लीज… आपण मज्जा करू… मग काय सनाया पण हट्ट करते. असं करत करत आज्जी अजून १० दिवस थांबते… नौटंकी…!!!

खरंच की आम्ही बोलता बोलता ११.३० वाजले होते. आज्जी टीव्ही बघून झोपली होती. सनाया पण… पण बाईंना कुठे येतेय झोप… शेपटी हलवत… खेळणं मला आणून दिलं आणि ड्रेस खेचत हॉलमध्ये घेऊन गेली. पकडापकडीचा आमचा खेळ रात्री १२.३० पर्यंत सुरूच होता.

चला… आता झोपायला बास… असा मम्माचा आवाज आला तेव्हा धावत धावत खेळणं टाकून बिछान्यात जाऊन बाई गुडूप… जणू काही ‘मी कुठं अदिती मावशी खेळत होती’… डँबिस… मिश्ती आमची!