
हैदराबाद येथील एक आयआरएस(IRS) अधिकारी एम असुसूया यांची आता पुरुष म्हणून सरकारी कागदपत्रांमध्ये नोंद होणार आहे. लिंग बदलल्यानंतर अनुसूया यांनी सरकारी कागदपत्रांमध्ये आपले नाव आणि लिंग बदलण्यासाठी मंत्रालयाकडे अर्ज केला होता. हा अर्ज मंत्रालयाने मंजूर केला असून आता त्यांना त्यांच्या विभागात पुरुष मानले जाईल. हिंदुस्थानच्या नागरी सेवेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, अनुसूया यांच्या विनंती अर्जावर विचारविनिमय करून मंत्रालयाने अखेर त्यांच्या नाव आणि लिंग बदलाला मंजुरी दिली आहे. यापुढे अनुसूया यांची ‘श्री एम अनुकाथिर सूर्य’ अशी अधिकृत नोंद केली जाईल असेही महसूल विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अनुसूया यांनी चेन्नईच्या मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बॅचलर डिग्री घेतली. त्यानंतर त्यांनी नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट विद्यापीठातून सायबर लॉ आणि सायबर फॉरेन्सिक्समध्ये पीजी डिप्लोमा केला. यानंतर 2013 मध्ये चेन्नईमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून आपल्या कारकीर्दीला त्यांनी सुरूवात केली आणि 2018 मध्ये त्यांना उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली होती.