बजेटपूर्वीच कटोरा पुढे; केंद्राने रिझर्व्ह बँकेकडे मागितले 10 हजार कोटी

तिजोरीतील खडखडाट, तशात आर्थिक मंदीचा मार त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार पुरते हतबल झाले आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारीला सादर होणाऱया अर्थसंकल्पापूर्वीच मोदी सरकारने पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेकडे कटोरा पुढे केला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. महसुलातील ही तूट भरून काढण्यासाठी सरकारने 10 हजार कोटींच्या अंतरिम लाभांशाची मागणी रिझर्व्ह बँकेकडे केली आहे. एवढेच नव्हे तर सरकारने शत्रूच्या मालमत्ता विकण्याचीही तयारी सुरू केली असून त्यासाठी तीन समित्याही स्थापन केल्या आहेत.

मोदी सरकार येत्या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्याआधीच रिझर्व्ह बँकेकडे 10 हजार कोटींची मागणी केली आहे. मात्र यावर रिझर्व्ह बँकेने अजून कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाची 15 फेब्रुवारीला नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारच्या मागणीवर निर्णय होऊ शकतो. त्यामुळे 1 फेब्रुवारीला सादर होणाऱया अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारला 10 हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी आपली ताळेबंदाच्या सहामाही ऑडिटची व्यवस्था केली होती. त्याआधारेच सरकारच्या मागणीवर विचार होणार आहे.

शत्रूच्या मालमत्तेतून 1 लाख कोटी उभारणार
मोदी सरकारने देशातील शत्रूच्या मालमत्ता विकण्याची तयारी केली आहे. देशभरात शत्रूच्या 9400 मालमत्ता असून त्या विकून 1 लाख कोटींचा निधी उभारण्याचे सरकारचे नियोजन आहे. संबंधित मालमत्तांचा निपटारा करण्यासाठी तीन उच्चस्तरीय समित्या नेमल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गट इतर दोन समित्यांवर तसेच विक्री प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणार आहे. मंत्री गटात गृहमंत्र्यांव्यतिरिक्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर इतर दोन समित्या कॅबिनेट सचिव राजीव गौबा आणि गृह सचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राहणार आहेत. पाकिस्तान आणि चीनचे नागरिकत्व स्वीकारलेल्या लोकांच्या या मालमत्ता आहेत. पाकिस्तानात गेलेल्यांच्या 9280 तर चीनमध्ये गेलेल्या नागरिकांच्या 126 मालमत्ता आहेत. पाकिस्तानींच्या सर्वाधिक मालमत्ता उत्तर प्रदेशात, तर चीनी नागरिकांच्या मेघालयात सर्वात जास्त मालमत्ता आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या