राहुल गांधींनी केले मोदी सरकारचे कौतुक, वाचा सविस्तर बातमी

कोरोना व्हायरसशी लढा देण्या करता केंद्र सरकारने गुरुवारी नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शेतकरी, गरीब महिला, ज्येष्ठ नागरिकांना मदत देण्यासाठी पंप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत 1.70 लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कौतुक केले आहे.

राहुल गांधी यांनी एक ट्वीट करत मोदी सरकारचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘केंद्रा सरकारने आज आर्थिक मदत पॅकेज जाहीर केले जे योग्य दिशेने पहिले पाऊल आहे. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या हिंदुस्थानातील शेतकरी, रोजंदारी मजदूर, महिला आणि वृद्धांना मदत केलीच पाहिजे.’

केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या एक दिवस आधी बुधवारी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दोन सूचना केल्या होत्या. राहुल गांधी म्हणाले होते की, आपला देश कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. आज प्रश्न असा आहे की, आपण असे काय करायला हवे जेणेकरून कमीत कमी जीवित हानी होईल? या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची सरकारची मोठी जबाबदारी आहे. मला असे वाटते ही परिस्थिती दोन भागात विभागली जावी. एक म्हणजे या आजाराशी लढा देण्यासाठी एकांत राहणे आणि संसर्ग टाळण्यासाठी रूग्णांची मोठ्या प्रमाणात तपासणी करणे. शहरी भागातील आपत्कालीन तात्पुरत्या रुग्णालयाचा त्वरित विस्तार करणे. तसेच या रुग्णालयात संपूर्ण आयसीयू सुविधा उपलब्ध असावी. दुसरी सूचना अशी की, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना तातडीने मदतीची गरज आहे. त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जावेत. तसेच त्यांना मोफत राशन दिले जावे. तसेच देशात व्यापार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत नोकर्‍या सुरक्षित करण्यासाठी करात सूट आणि आर्थिक मदत दिली जावी. देशातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना ठोस सरकारी आश्वासन देण्याचीही गरज आहे, या दोन सूचना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या