गर्दी करू नका, पालिकेला केंद्राकडून 8 लाख 34 हजार डोस

मुंबईत 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी पहिल्या दोन्ही दिवशी नोंदणी अनिवार्य असलेल्याकोविनऍपमधील गोंधळाने ज्येष्ठांसह सगळ्याच लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला  होता. मात्र आज तिसऱया दिवशीकोविनऍप रुळावर आले असून लसीकरण सुरळीत झाले आहे. दरम्यान, पालिकेला केंद्राकडून  8 लाख 34 हजार डोस मिळाले असून आतापर्यंत अडीच लाखांवर जणांना कोरोना लस देण्यात आली आहे.

मुंबईसह महाराष्ट्र-देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले. यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि दुसऱया टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात येत असून आता तिसरा टप्पाही सुरू झाला आहे. कोरोना लसीकरणाच्या तिसऱया टप्प्यात 45 ते 59 वर्षे वयोगटातील सहव्याधी असणारे आणि  60 वर्षांवरील ज्येष्ठांना लसीकरण करण्यात येत आहे. शिवाय थेट केंद्रावरच ‘कोविन’ ऍपमध्ये नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने व्हॅक्सिनेशन सेंटरवर मोठी गर्दी होत आहे. शिवाय कोविन ऍपच्या गोंधळाचा फटकाही बसत आहे. या पार्श्वभूमीवर कोविन ऍपमध्ये सुधारणा करण्यासाठी पालिकेने केंद्र, राज्य सरकारला पत्रही दिले आहे. दरम्यान, तिसऱया टप्प्यातील लसीकरणाच्या तिसऱया दिवशी पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर व्हॅक्सिनेशन सुरळीत झाल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

बीकेसी लसीकरण केंद्राचा महापौरांकडून आढावा

वांद्रे-कुर्ला संकुलातील पालिकेच्या जम्बो कोविड लसीकरण केंद्राला महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत लसीकरणाबाबत चर्चाही केली. घरी गेल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर दिलेल्या फॉर्मवरील हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर, बीकेसी जम्बो कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या