गोरक्षकांची गय करू नका! पंतप्रधानांचे राज्यांना आदेश

12

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन गोमांसाच्या संशयावरून हिंसक हल्ले करत सुटलेल्या गोरक्षकांची अजिबात गय करू नका, असे सांगतानाच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वच राज्यांच्या सरकारांना दिला. उद्यापासून सुरू होणाऱया संसद अधिवेशनाच्या निमित्ताने बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते.

गोरक्षणाच्या मुद्दय़ाला राजकीय रंग चढू देऊ नका, असे आवाहन राजकीय पक्षांना करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, या प्रश्नावरून निर्माण होणाऱया जातीय हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा. सहकार्य करावे.

गाईला गोमाता म्हणत हिंदू तिला आईच मानतात. मात्र त्या श्रद्धेतून, भावनेतून कायदा हातात घेण्यास लोकांनी प्रवृत्त होता कामा नये, असे त्यांनी बजावले. तसेच कायदा हातात घेऊन हिंसाचार करणाऱयांविरोधात राज्यांच्या सरकारांनी कठोर कारवाई केली पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

देशात गोरक्षणासाठी कायदा आहे. पण गोरक्षणाच्या नावाखाली कोणी गुन्हे करत सुटेल तर ते सहन केले जाणार नाही, अशी तंबी मोदी यांनी दिली. गोरक्षकांना पंतप्रधानांनी ताकीद देण्याची ही तिसरी वेळ आहे.
या बैठकीला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येच्युरी, समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव, सीपीआयचे डी. राजा आदी नेते उपस्थित होते. तृणमूल काँगेस आणि संयुक्त जनता दलाचा कोणीही प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नव्हता. तृणमूल काँगेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला होता.

भ्रष्टाचार हटाओच्या लढाईत सर्वच राजकीय पक्षांनी सरकारला सहकार्य केले पाहिजे. भ्रष्टाचारामुळे राजकीय नेत्यांची प्रतिमा धुळीला मिळते.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आपली प्रतिक्रिया द्या