पैसे घ्या; खर्च करा! 30 लाख केंद्रीय कर्मचाऱयांना बोनस, दसऱयापासूनच दिवाळी

प्रातिनिधीक फोटो

कोरोनामुळे सुस्त पडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कर्मचाऱयांना पैसे घ्या आणि खर्च करा असे धोरण अवलंबिले आहे. 30लाख 67 हजार केंद्रीय कर्मचाऱयांसाठी 3737 कोटी रूपयांचा बोनस जाहीर केला आहे. आठवडय़ात हा बोनस कर्मचाऱयांच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे दसऱयापासूनच कर्मचाऱयांची दिवाळी सुरू होणार आहे.

यापूर्वी दसरा-दिवाळी या उत्सवांसाठी केंद्रीय कर्मचाऱयांना 10 हजार रूपये अॅडव्हान्स देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आज मंत्रीमंडळ बैठकीत 3737 कोटी रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

असा मिळणार बोनस
– 2019-20 या वर्षासाठी प्रोडक्टिव्ह लिंक्ड बोनस (पीएलबी) विना राजपत्रित कर्मचाऱयांना देण्यात येईल. 2791 कोटींचा हा बोनस असून, याचा लाभ रेल्वे, पोस्ट, संरक्षण, ईपीएफओ, ईएसआयसीमधील 16 लाख 97 हजार कर्मचाऱयांना होणार आहे.
– या व्यक्तीरिक्त केंद्र सरकारच्या विना राजपत्रित कर्मचाऱयांना 903 कोटी रूपयांचा नॉन प्रॉडक्टिविटी लिंक्ड बोनस देण्यात येईल. याचा लाभ 13 लाख 70 हजार कर्मचाऱयांना होईल.
– लवकरात लवकर हा बोनस कर्मचाऱयांच्या खात्यात जमा होईल.

बाजारात पैसा येईल
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला आहे. अनलॉकनंतर बाजारपेठा, सेवाक्षेत्र खुले झाले तरी व्यवहाराला फार गती आलेली नाही. कर्मचाऱयांच्या हातात पैसे दिल्यास दसरा-दिवाळी काळात खरेदी वाढेल, बाजारात पैसा येईल. पर्यायाने अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा केंद्र सरकारचा अंदाज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या