केंद्र सरकारने दिवाळीअगोदरच आपल्या कर्मचार्यांना भेट दिली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. हा महागाई भत्ता १ जुलै पासून लागू होणार असून तेव्हापासूनची थकबाकीही कर्मचार्यांना देण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता तीन टक्के वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सध्या केंद्रीय कर्मचार्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळतो. तो आता वाढून 53 टक्के होणार आहे. या निर्णयाचा लाभ निवृत्तीधारकांनाही होणार आहे. शासकीय कर्मचार्यांना देण्यात येणार्या महागाई भत्त्यांमध्ये वर्षातून दोन वेळा वाढ करण्यात येते. जानेवारी आणि जुलैमध्ये हा भत्ता वाढवून मिळतो.
सहा पिकांच्या हमीभावात वाढ
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहू, मोहरी, जवस, हरभरा तसेच मसूर आणि करडईच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. गव्हाच्या हमीभावात 150 रुपयांची वाढ करण्यात आली असून तो आता 2475 रुपये असेल. मोहरीच्या भावात 300 रुपये तर जवसाच्या हमीभावात 130 रुपये वाढ करण्यात आली आहे. हरभर्याचा हमीभाव 210 रुपयांनी वाढवण्यात आला असून मसूर 275 तर करडईच्या हमीभावात 140 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.