केंद्राची विमा पॉलिसी अचानक बंद, आरोग्य कर्मचाऱयांमध्ये संतापाची लाट

देशभरात उसळलेल्या कोरोनाच्या दुसऱया लाटेतही आरोग्य कर्मचारी, परिचारिका आणि डॉक्टर वर्ग युद्धपातळीवर काम करीत आहे. पण दुसरीकडे केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे देशभरातील आरोग्य कर्मचाऱयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 50 लाखांचा विमा काढण्यात आला होता. ही योजना आता तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेत मृत्युमुखी पडणाऱयांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. केंद्राच्या या निर्णयामुळे आरोग्य कर्मचाऱयांच्या कुटुंबाना आता या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.

देशातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱया आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि परिचारिकांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत 30 मार्च 2020 रोजी 50 लाखांचा विमा काढला होता. सुरुवातीला हा विमा 90 दिवसांसाठी होता. त्यानंतर या विमा योजनेचा कालावधी 24 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आला, मात्र त्यावेळी या विमा योजनेची अंमलबजावणी न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडमार्फत करण्यात आली. मात्र आता कोरोनाच्या दुसऱया लाटेत ही योजना कायम ठेवण्याऐवजी संपुष्टात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत आतापर्यंत 287 मृतांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यात आला आहे. कोरोना काळामध्ये आपला जीव गमावणारे डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना मदतीचा आर्थिक हात देण्यासाठी या योजनेने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.

24 मार्च 2021 ला संपुष्टात आलेल्या या योजनेंतर्गत दावा दाखल करण्यासाठी केंद्र सरकारकडून एक महिन्याची वाढीव मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे 24 एप्रिलपर्यंत सर्व राज्याने त्यांच्या आरोग्य कर्मचाऱयांच्या विम्याचे दावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

एकीकडे जिवाजी पर्वा न करता आम्ही या युद्धात अहोरात्र मेहनत करत होता. अशा वेळी केंद्राने ही विमा योजना बंद करणे चुकीची असल्याची भावना अनेक डॉक्टरांकडून वर्तविण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या