केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना, 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम ठेवा!

देशात कोरोनाचा फैलाव अजून पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जारी केलेले निर्बंध 31 ऑगस्टपर्यंत कायम ठेवा, पॉझिटीव्हीटी रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये कडक पावले उचला, अशा सूचना केंद्र सरकारने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. देशभर कोरोना पुन्हा वाढल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी हे निर्देश जारी केले.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात राज्यांना पत्र लिहिले आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत मधेच घट होत असली तरी विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे अजूनही काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. टेस्ट, ट्रक, ट्रीटमेंट, लसीकरण आणि मार्गदर्शक तत्त्वे या पंचसूत्रीवर सातत्याने लक्ष ठेवलेच पाहिजे, विषाणूच्या पुनरुत्पादन घटकात कोणतीही वाढ होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत घट होत असल्याने काही राज्यांनी अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे.

रुग्णसंख्येतील घट ही समाधानाची बाब असली तरी सरसकट रुग्णसंख्या जास्तच आहे. त्यामुळे विषाणूला पुन्हा हातपाय पसरण्याची संधी देता कामा नये, निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक हाताळली पाहिजे, असे गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे कळवले आहे.

सोमवारच्या तुलनेत मंगळवारी तब्बल 47 टक्के रुग्णवाढ!

देशात मंगळवारी आढळलेल्या कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येने पुन्हा धडकी भरवली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी रुग्णसंख्येत तब्बल 47 टक्क्यांची वाढ झाली. मागील तीन आठवडय़ांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी 24 तासांत 43 हजार 654 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, तर 640 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या सूचना

  • पॉझिटीव्ह रुग्ण सापडत असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लागू करा.
  • काही दिवसांवर आलेल्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी लोकांना बेफिकीर वागू देऊ नका.
  • कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्यासाठी सर्व जिल्हा तसेच स्थानिक पातळीवरच्या प्रशासनांना सक्त निर्देश द्या.
  • नियमावलीच्या अंमलबजावणीत हयगय झाल्यास संबंधित अधिकाऱयांना व्यक्तिशः जबाबदार धरा.
आपली प्रतिक्रिया द्या