सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, परशुराम गंगावणे यांना पद्मश्री

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, दिवंगत ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्यासह सात जणांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना ‘पद्मभूषण’ तर अनाथांच्या ‘माई’ असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, समाजसेवक गिरीष प्रभुणे, ‘चित्रकथी’ कला जतन करणारे सिंधुदुर्गातील पिंगुळी येथील परशुराम आत्माराम गंगावणे यांच्यासह 102 मान्यवरांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिवर्षी ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा केली जाते. कला, साहित्य, विज्ञान, उद्योग, क्रीडा, समाजसेवा आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱया दिग्गजांचा गौरव करण्यात येतो. यावर्षी सात मान्यवरांना दुसऱया क्रमाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ने सन्मानित करण्यात येणार आहे. 10 जणांना ‘पद्मविभूषण’ तर, 102 जणांना ‘पद्मश्री’ने गौरविण्यात येणार आहे.

पद्मविभूषण

 • शिंजो आबे (माजी पंतप्रधान, जपान)
 • डॉ. बेली मोनप्पा हेगडे (वैद्यकीय)
 • मौलाना वाहिदुद्दीन खान (धार्मिक)
 • बी. बी. लाल (पुरातत्व)
 • सुदर्शन साहू (कला)
 • ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम (मरणोत्तर)
 • नरेंद्रसिंह कापान्ने (मरणोत्तर)

पद्मभूषण

 • सुमित्रा महाजन (माजी लोकसभा अध्यक्षा)
 • के. एन. एस. चित्रा (ज्येष्ठ गायिका)
 • चंद्रशेखर कांबारा (प्रसिद्ध लेखक)
 • नुपेंद्र मिश्रा (प्रशासन)
 • रजनिकांत देविदास श्रॉफ (प्रसिद्ध उद्योगपती)
 • तारलोचन सिंह (प्रशासन)
 • रामविलास पासवान, दिवंगत केंद्रीयमंत्री (मरणोत्तर)
 • केशुभाई पटेल, माजी मुख्यमंत्री (मरणोत्तर)
 • तरुण गोगोई, माजी मुख्यमंत्री (मरणोत्तर)
 • कालबी सादिक (मरणोत्तर)

महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना ‘पद्मश्री’

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, प्रसिद्ध लेखक नामदेव कांबळे, चित्रकथी कला आणि कळसुत्री बाहुल्यांची कला जतन करणारे सिंधुदुर्ग जिह्यातील परशुराम आत्माराम गंगावणे, ज्येष्ठ समाजसेवक गिरीष प्रभुणे, उद्योगपती जसवंतीबेन जमनादास पोपट यांना ‘पद्मश्री’ नागरी सन्मान जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे चंद्रकांत संभाजी पांडव (दिल्ली), अमेरिकेतील लेखक श्रीकांत दातार यांचाही ‘पद्मश्री’ने सन्मान करण्यात येणार आहे.

यावर्षीही ‘भारतरत्न’ची घोषणा नाही

देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ची घोषणा यावर्षीही केंद्र सरकारने केलेली नाही. मोदी सरकारने ‘भारतरत्न’ सन्मान जाहीर न करण्याचे हे दुसरे वर्ष आहे.

आपली प्रतिक्रिया द्या