नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसह मिळाली होती असा कबुलीजबाबच नीट परीक्षा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बिहारमधील एका आरोपीने दिला आहे. परीक्षा घोटाळा प्रकरणात आतापर्यंत बिहारमधून तब्बल 19 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे नीट परीक्षा घोटाळ्यात कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचा किंवा पेपर फुटल्याचा पुरावा मिळालेला नाही. एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सी अत्यंत विश्वासार्ह संस्था आहे, असे दावे करणारे केंद्र सरकार शुक्रवारी सपशेल तोंडावर आपटले आहे. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेत हे दावे केल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्सवरूनही याबाबत पुनरुच्चार केला.
आरोपीने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पटनाच्या लर्न हॉस्टेलमध्ये आम्हाला 4 मे रोजी नेण्यात आले. उत्तरांसहीत प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आणि रट्टा मारायला सांगितला. परीक्षेत येणारे सर्वच्या सर्व प्रश्न उत्तरासहीत आम्हाला मिळाले. माझ्यासोबत आणखी 20 ते 25 परीक्षार्थी होते, त्यांनाही प्रश्नपत्रिका देण्यात आल्या, असेही आरोपीने सांगितले. पाटणा येथून अटक करण्यात आलेल्या आयुष या विद्यार्थ्याने हा कबुलीजबाब दिला असून त्याचा हा कबुलीजबाब पटना पोलिसांनी न्यायालयातही सादर केला.
उच्च न्यायालयांतील याचिका सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरीत करण्याची एनटीएची विनंती
विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेशसह 7 राज्यांच्या उच्च न्यायालयांत नीटमधील घोटाळ्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सर्व याचिका सर्केच्च न्यायालयात हस्तांतरीत करण्यात याव्यात अशी विनंती एनटीएने सर्वोच्च न्यायालयाकडे केली.
एफआयआरमध्ये काय?
एका टोळक्याने काही विद्यार्थी आणि परीक्षेचे नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रश्नपत्रिका फोडण्याचे काम केले. त्यामुळे प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेचे उल्लंघन झाले असून हे टोळके परीक्षा केंद्राच्या बाहेर JH01BW-0019 या गाडीतून फिरत होते. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला आणि पटेल भवनकडे जाणारी ही गाडी ताब्यात घेण्यात आली. वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. गाडीत चालकासह 3 जण होते. या चारजणांकडून प्रश्नपत्रिकेच्या प्रती ताब्यात घेण्यात आल्या. या चारही जणांची कसून चौकशी करण्यात आली. त्याकेळी रॉकी, नीतीश, अमित आनंद, संजीव सिंह यांच्या माध्यमातून पेपर फोडल्याची कबुली त्यांनी दिल्याचे पोलिसांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.
घोटाळा नाही म्हणता, मग गुजरातमध्ये पकडलेल्या रॅकेटचे काय?
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा, पेपर फुटल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. मग गुजरातच्या गोध्रामध्ये नीट-युजी परीक्षेत घोटाळा करणारे मोठे रॅकेट पकडण्यात आले त्याचे काय? असा परखड सकाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला. आहे. खरगे यांनी अनेक प्रश्न विचारून केंद्र सरकारच्या लपवाछपवीचा पर्दाफाश केला आहे.