केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय बदलणार नाही, सरकारचे लोकसभेत लेखी उत्तर

2676

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वरून 58 करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरामध्ये म्हटले आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय कमी होणार अशा चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे.

1 एप्रिल 2020 पासून सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात काही बदल करू शकते अशी चर्चा सुरू होती. त्यामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी हा संभ्रम दूर केला असून कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबाबत लोकसभेतच लेखी उत्तरात माहिती दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय हे साठ वर्षे राहील हे स्पष्ट झाले आहे.

‘तसेच मूलभूत नियम 56 (जे), केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम,1972च्या नियम 48 आणि नियम 16 (3) (संशोधित) ऑल इंडिया सर्व्हिसेस (मृत्यू/निवृत्तीपश्चात लाभ) नियम, 1958अंतर्गत तरतुदीनुसार सरकारला वेळेआधी अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचा पूर्ण अधिकार आहे. सरकारकडे सार्वजनिक हितार्थ कर्मचाऱ्याला नोटीस पाठवण्याचा अधिकार आहे. अशा प्रकरणात सरकार 3 महिन्यांहून कमी कालावधीसाठी नोटीस देऊ शकत नाही किंवा तीन महिन्यांचे वेतन आणि भत्ते देईल,’ अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिली. ग्रुप ‘ए’ किंवा ग्रुप ‘बी’, स्थायी अथवा अस्थायी स्वरूपात सेवेत असलेले आणि वय वर्षे 35 च्या आधी रूजू झालेले आणि 50 हून अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांना या तरतुदी लागू होऊ शकतात. तर अन्य प्रकरणांत वय वर्षे 55 पेक्षा अधिक असलेल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू असतील, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

आपली प्रतिक्रिया द्या