पीएफप्रमाणे आता ग्रॅच्युइटी पण ट्रान्सफर करता येणार ?

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

५ वर्षांच्या आत नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा फायदा मिळावा यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालय ग्रॅच्युइटीबाबतच्या नियमांमध्ये काही बदल करण्याच्या तयारीत आहे. या बदलांमुळे पीएफ प्रमाणे कर्मचाऱ्याला त्याची ग्रॅच्युइटीपण ट्रान्फर करता येईल. यासाठी पीएफप्रमाणेच कर्मचाऱ्यांना एक नंबर देण्यात येईल ज्याच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. ग्रॅच्युइटीचा फायदा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना व्हावा यासाठी हे बदल करण्यात येणार आहे. यासाठी कामगार मंत्रालय लवकरच कर्मचारी संघटना आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत एक बैठक बोलावणार आहे.

या बदलाचा फायदा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. ५ वर्षाच्या आत नोकरी सोडल्याने किंवा कंत्राटी कामगारांना ५ वर्षाच्या आत दुसरीकडे कामाला लावल्याने त्यांच्या ग्रॅच्युइटीचं नुकसान होतं. सध्याच्या नियमांनुसार ग्रॅच्युइटीचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याने एका संस्थेमध्ये कमीत कमी ५ वर्ष काम करणं आवश्यक आहे. असं न केल्यास त्याला सीटीसी पॅकेजमधून कापून घेतलेले पैसे परत मिळत नाही. त्यामुळे कामगार मंत्रालय ग्रॅच्युइटी कायद्यात बदल करण्याचा विचार करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या