तुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना फटकारले

1463

देशात विकास कामांसाठी आणि विविध योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नाही. आपल्याकडे निर्णयक्षमता नाही. तसेच घेतलेल्या निर्णयांची योग्यपद्धतीने अंमलबजावणी होत नाही. या मुख्य समस्या असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. तसेच सरकारच्या कार्यशैलीवरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. विविध योजनांवर काम होत नसल्याचे कारण म्हणजे सरकारची मानसिकता आणि नकारात्मक दृष्टीकोन असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. नागपुरात एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सनदी अधिकाऱ्यांनाही फटकारले.

सरकारकडे निर्णयक्षमता नसल्याचे विधान गडकरी यांनी केल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. ”परवा आपण एका उच्च स्तरीय बैठकीला गेले होतो. तिथे हे सुरू करणार…. ते सुरू करणार… असे आयएएस अधिकारी सांगत होते. आपण त्यांना म्हणालो की, तुम्ही का सुरू करणार?… तुमची जर सुरू करण्याची हिम्मत असती, तर तुम्ही आयएएस अधिकारी बनून इथे नोकरी का करता?. तुमच्यात धमक असती तर तुम्ही स्वतः हे सुरू करून उद्योगपती झाला असतात. ज्यांनी उद्योग किंवा प्रकल्प सुरू केले आहेत, त्यांना मदत करा. तेच तुमचे काम आहे. आपण जनतेला सुविधा पुरवण्यासाठी आहोत” असेही गडकरी यांनी सनदी अधिकाऱ्यांना सुनावले.

गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत आपण 17 लाख कोटी रुपयांची कामे केली आहेत. या वर्षांत त्यात पाच लाख कोटी रुपयांची भर पडणार आहे. विकासकामांसाठी आणि विविध योजनांसाठी पैशांची कमतरता नाही. काम करण्याच्या मानसिकतेचीच कमतरता आहे आणि नकारात्मक दृष्टीकोनही आपल्याला महत्त्वाचा अडसर ठरत असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या