मध्य रेल्वे अकरा तास ठप्प

68

कल्याणजवळ लोकलचे पाच डबे घसरले

कल्याण– कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकल खोळंबा होणे हे मध्य रेल्वेचे नित्याचेच झाले आहे. आज तर चाकरमान्यांची दिवसाची सुरुवातच तीनतेरा करणारी ठरली. कुर्ला-अंबरनाथ लोकलचे पाच डबे कल्याण ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांदरम्यान रुळाला तडे गेल्यामुळे घसरले. पहाटे ६ वाजून ३ मिनिटांनी ही दुर्घटना घडली. ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वे ठप्प झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. कल्याण-कर्जत मार्गावरील वाहतूक तर पूर्णपणे ठप्प झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सीएसटी-कर्जत मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा अकरा तासांहून अधिक काळ ठप्प होती. केवळ सीएसटी-कल्याण लोकलसेवा सुरू होती. दरम्यान, दुरुस्तीनंतर पहिली लोकल संध्याकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी रवाना झाली. मध्य रेल्वे अकरा तास ठप्प होती. या घटनेमुळे दिवसभरात १६३ लोकलच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या.

कल्याणहून लोकल सुटली आणि अवघ्या पाचच मिनिटांत मोठा आवाज झाला. यामुळे प्रवासी वर्गात एकच गोंधळ उडाला. एकापाठोपाठ पाच डबे रुळावरून घसरले. अपघात की घातपात अशी शंका घेऊन डब्यामधून प्रवाशांनी पटापट उड्या मारून सैरावैरा धावण्यास सुरुवात केली. मात्र काही वेळातच डबे घसरले असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. लागलीच प्रवाशांनी माघारी येत कोणी जखमी झाले आहे का याची पाहणी केली. मात्र सर्व सुखरूप होते. डब्यात अडकलेल्या महिला प्रवाशांना एकमेकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सकाळी सीएसटीकडे जातांना लोकलला जास्त गर्दी असते. नेमके कुर्ला येथून अंबरनाथला येणार्‍या लोकलला गर्दी कमी होती. याच लोकलला अपघात घडल्याने मोठा गोंधळ उडाला नाही. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

– लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
लोकलसह लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रकदेखील कोलमडले आहे. रुळावरून घसरलेले डबे हटवण्यास पुरेसा वेळ लागला. यानंतरही वेळापत्रकाप्रमाणे लोकल आणि एक्सप्रेस, मालगाडी सेवा सुरू होण्यास विलंब होणार असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून आधीच इंद्रायणी एक्सप्रेस कल्याणला न आणता ती दिवामार्गे वळवली. तर अन्य काही गाड्या कर्जत, पनवेल मार्गे वळविल्या. महत्त्वाचे म्हणजे डेक्कन आणि पुणे इंटरसिटी या दोन्ही गाड्या रद्द करण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनावर आली.

रुळाला एक मीटरपर्यंत भला मोठा तडा
रुळाला तब्बल एक मीटरपर्यंतचे तडे गेल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले. दुर्घटनेनंतर अर्ध्या तासातच आपत्कालीन यंत्रणा कामाला लागली. दुपारी अडीच वाजता घसरलेले डबे हटवण्यात यश आले. विजेच्या, सिग्नलच्या खांब्यांचे तसेच पेंटॉग्राफ, रुळांचे मोठे नुकसान झाले आहे. काही खांब डब्यांच्या धडकेमुळे कोसळले आहेत. त्यामुळे घसरलेले डबे जरी हटवले असले तरी अन्य तांत्रिक तसेच पायाभूत कामे करण्यास विलंब लागणार असल्याने रेल्वे सेवा पूर्ववत होण्यास बराच वेळ लागणार असल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितले.

– केडीएमटीमुळे रिक्षावाल्यांच्या मनमानीला चाप
मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडल्याने प्रवाशांना मोठया मनस्तापाला सामोरे जावे लागले. अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, विठ्ठलवाडीच्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत होता. सकाळी कामावर जाण्याची घाई असल्याने रिक्षावाले याचा गैरफायदा घेऊन मनमानीपणे भाडे वसूल करत होते. मात्र त्यांना लगाम घालण्याचे काम कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने केले. प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचता यावे, यासाठी केडीएमटीने विविध मार्गावर २५ हून अधिक जादा बस सोडल्या. लोकल सेवा पूर्वपदावर येईपर्यंत या बसेस अखंड धावत होत्या. स्वत: परिवहन सभापती भाऊसाहेब चौधरी घटनास्थळी ठाण मांडून या सेवेवर देखरेख ठेवून होते. परिवहन सेवेचा प्रवाशांना मोठा हातभार मिळाला.

घटनेची चौकशी करा!
लोकल घसरल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तत्काळ दुर्घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ अधिकारी त्यांच्यासोबत होते. सर्व पाहणी करून त्यांनी माहिती घेतल्यानंतर ते म्हणाले, थंडीच्या हंगामात रुळाना तडे जातात असे अधिकारी म्हणतात. मात्र वारंवार अशा घटना का घडतात याचा विचार होणे गरजेचे आहे. रुळाना तडे जाण्याला नैसर्गिक वातावरणच जबाबदार आहे की स्टील, पोलाद यांची गुणवत्ता. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व बाबींची सखोल चौकशी होऊन दोषींवर करवाई झाली पाहिजे असेही डॉ. शिंदे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या