ग्रह फिरल्याने मध्य रेल्वेवर समस्या, अधिकाऱ्यांचे नवग्रहापुढे लोटांगण

328
central-railway-rain

सामना ऑनलाईन, मुंबई

मध्य रेल्वेची लोकल सेवा रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे विस्कळीत होत असते. याला कारणीभूत रेल्वेचे अधिकारी किंवा कर्मचारी जबाबदार नसून ग्रहांची वक्रदृष्टी असल्याचा शोध काही अधिकाऱ्यांनी लावला आहे. या मार्गावरील अडीअडचणी दूर करणे, त्या पुन्हा उद्भवू नये म्हणून दीर्घकालीन उपाययोजना करणे हे सोडून या अधिकाऱ्यांनी नवग्रह शांती केली आणि या नवग्रहांना आमच्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ दूर कर अशी प्रार्थना केली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे या पुजेचे आयोजन करण्यात आले होते. सुनील शास्त्री या पुजाऱ्याला पूजा घालण्यासाठी बोलावण्यात आले होते. शास्त्री यांनी मुंबई मिरर या वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले की शुक्रवारी त्यांना रेल्वेच्या अधिकाऱ्याचा फोन आला होता. शनिवारी पूजा असून ती करण्यासाठी आमंत्रण द्यायला हा फोन करण्यात आला होता. मध्य रेल्वेवर काही ग्रह रुसले असून त्यांचा कोप शांत करून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी ही पूजा घालण्यात आल्याचं शास्त्री यांनी सांगितले. राष्ट्रीय रेल्वे कामगार संघटनेचे सरचिटणीस वेणू नायर यांनी या पुजेबद्दल आश्चर्य व्यक्त करताना म्हटले आहे की ‘अशी पूजा यापूर्वी कधीही झाली नव्हती. या पुजेला कर्मचारी कोणीही नव्हते फक्त अधिकारीच पुजेत सहभागी झाले होते.’ मध्य रेल्वेचे मुख्यजनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी मुंबई मिररशी बोलताना  नवग्रह पूजा झालीच नसल्याचं म्हटलं आहे.मध्य रेल्वेकडून वर्षाला फक्त एकच पूजा आयोजित केली जाते, जर नवग्रह पूजा झाली असेल तर ती रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आयोजित केली असावी असे त्यांचे म्हणणे आहे.

जून महिन्यात थेंबभर पाऊस पडो अथवा धो-धो पाऊस पडो मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या नियमित पद्धतीने उशिरा धावत होत्या. पुण्याजवळ आणि नाशिकजवळ दरडी कोसळल्या, दोन मालगाड्या घसरल्या. 2 जुलै रोजी झालेल्या तुफान पावसानंतर हवामान खात्याच्या हवाल्याने मध्य रेल्वेने 3 जुलैला रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालवल्या. नैसर्गिक संकटाप्रमाणेच रेल्वे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांची पुरती वाट लावली होती. फक्त जून-जुलैच नाही तर ऐरवीही मध्य रेल्वेच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलेलं असतं. या मार्गावर वाहतूक विस्कळीत होण्यासाठी काही विशेष कारणाची गरज भासत नाही. मध्य रेल्वेपेक्षा पश्चिम रेल्वेची वाहतूक प्रतिकूल परिस्थितीमध्येही अनेकदा व्यवस्थित सुरू असते. जर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळित सुरू राहू शकते तर मग मध्य रेल्वेला ते का शक्य होत नाही हा प्रश्न या मार्गाने प्रवास करणाऱ्या लाखों प्रवाशांना रोज पडत असतो.

आपली प्रतिक्रिया द्या