मध्य रेल्वेवर मालगाडीची सुरक्षा तपासणी प्रथमच महिला टीमने केली

आजच्या काळात असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे महिलांनी पराक्रम गाजवला नाही. रेल्वे विभागही यात विरळा नाही. मोटरमन-गार्डपासून ते थेट अभियंते तसेच अधिकारी म्हणूनही महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असतात. मध्य रेल्वेच्या मालगाडय़ांच्या प्रवासापूर्वी करण्यात येणाऱया सुरक्षा तपासणीचे काम प्रथमच एका महिला टीमने केले आहे.

कोविड काळात पुरवठा साखळी चालू राहण्यासाठी रेल्वे जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्याची वाहतूक करीत आहे. अशा मालवाहतूक करणाऱया गाडय़ांची काही ठरावीक फेऱयांनंतर सुरक्षा तपासणी केली जाते. मध्य रेल्वेवर प्रथमच मालगाडी ट्रेनची सखोल तपासणी दहा जणींच्या महिला टीमने केली आहे.

कल्याण गुड्स यार्डात ही तपासणी करण्यात आली. अशा प्रकारचे काम करणारी ही पहिली महिला टीम आहे. स्टील लोडिंगसाठी वापरल्या जाणाऱया अशा 44 बीओएसटी प्रकारच्या वॅगनच्या रेकची तपासणी 8 जून रोजी संपूर्ण महिला टीमद्वारे केली. यात गिअर तपासणी, एअर ब्रेक टेस्टिंग, अंडर फ्रेम्सची तपासणी, साइड पॅनेल्स आणि सदोष घटक व संबंधित दुरुस्ती अशी तपासणी साडेचार तासांत पूर्ण झाली. तसेच पुढच्या प्रवासासाठी या रेकना फिट ठरविण्यात आले. या पथकात अर्चना जाधव, ज्योती दामोदरे, अश्विनी पाटील, श्वेता सूर्यवंशी, प्रियांका खोलेकर, दीपाली, सुनीता, सविता, सुजाता आणि खुशबू आदींचा समावेश आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ते मे 2021 या काळात 12.57 दशलक्ष टन (66.5 टक्के अधिक) मालवाहतूक केली आहे. तर गेल्या वर्षी 2020 मध्ये याच काळात 7.55 दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या