मुस्लीम देशांतील वाहिन्यांवर सरकारची नजर; केबल चालकांना निर्देश जारी

981

जम्मू कश्मीरमधील केबल चालकांना सरकारने मुस्लीम देशातील वाहिन्या प्रसारीत करण्याबाबत निर्देश जारी केले आहेत. जम्मू कश्मीरमध्ये काही केबलचालक पाकिस्तान, तुर्कस्तान,मलेशिया आणि इराणच्या वाहिन्या दाखवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.  केंद्र सरकारने 5 ऑगस्टला जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानसोबत मलेशिया आणि तुर्कस्तानने या निर्णयाचा विरोध केला होता. मात्र, सौदी अरब, यूएई आणि इराणने हिंदुस्थानचा निर्णयावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता.

केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशांमध्ये केबल चालकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली आहे. काही केबल चालक सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या वाहिन्यांव्यतिरिक्त इतर वाहिन्यांचे प्रसारण करत असल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकारे यादीत नसलेल्या वाहिन्यांचे प्रसारण करणे केबल टीव्ही नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे अशा वाहिन्यांचे प्रसारण झाल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाने 500 पेक्षा जास्त वाहिन्यांना परवानगी दिली आहे. केबल टीव्ही नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांचे लायसन्स रद्द करून त्यांचे वाहिन्या प्रसारणाचे साहित्य जप्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. केबल टीव्ही चालकांसोबत श्रीनगरमध्ये झालेल्या  बैठकीत माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयातील संयुक्त सचिव विक्रम सहाय यांनी ही माहिती दिली. इराण, तुर्कस्तान,मलेशिया आणि पाकिस्तानातील वाहिन्यांचे प्रसारण तातडीने बंद करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्याचे केबल चालकांनी सांगितले.

इराणचे सहर आणि सोदी अरेबियातील अल अरबिया वाहिनीचे प्रसारण करत असल्याचे काही केबल चालकांनी सांगितले. या वाहिन्यांवरील धार्मिक कार्यक्रमांमुळे जम्मू कश्मीरमध्ये या वाहिन्यांचा मोठा प्रेक्षकवर्ग असल्याचे ते म्हणाले. इंटरनेट बंद असल्याने इराण, तुर्कस्तान,सौदी अरब, मलेशिया, पाकिस्तान या देशातील धार्मिक वाहिन्यांचे केबल चालकांकडून प्रसारण केले जात आहे. याबाबत आम्हाला अलर्ट आल्यानंतर हे रोखण्यासाठी निर्देश जारी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या