सेंच्युरी रेयॉनमध्ये स्फोट; कामगारांच्या शरीरात काचा घुसल्या

शहाडजवळील सेंच्युरी रेयॉन कंपनी डेंजर झोन बनली आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी सल्फ्युरिक ऑसिडने चार कामगार होरपळल्याची घटना घडली असतानाच स्पिनिंग प्रोडक्शन डिपार्टमेंटमधील ग्लास पॉटचा स्फोट झाल्याचे उघड झाले. या दुर्घटनेत कामगारांच्या शरीरात काचांचे तुकडे घुसले. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

27 नोव्हेंबर रोजी सेंच्युरी रेयॉनमध्ये अंकित सिंग हा कामगार सल्फ्युरिक ऑसिड प्लॅण्टची साफसफाई करीत असताना पाइपलाइनचा नटबोल्ट निघाला आणि त्यातून ऑसिडचा फवारा उडाला. या दुर्घटनेत अंकित सिंग याच्या तोंडावर ऑसिड उडाले तर बाजूला असलेले पंकज सिंग, केतन जाधव, अनिल कणसे यांच्यासह काही कामगार ऑसिड उडाल्याने होरपळले. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री नाईट शिफ्ट सुरू असताना स्पिनिंग प्रोडक्शन विभागातील पॉटचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत काचांचे तुकडे लक्ष्मण यादव, विकास मोरे, गोरख जिरेमाळी, रवी शुक्ला यांच्यासह काही कामगारांच्या शरीरात घुसून ते जखमी झाले. त्यांना तत्काळ कंपनीच्या रुग्णालयात हलवून उपचार करण्यात आले.

कंपनी म्हणते ही किरकोळ घटना
याबाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता अवघ्या तीन दिवसांत घडलेल्या सल्फ्युरिक ऑसिड आणि पॉट ब्लास्ट या दुर्घटना किरकोळ असल्याचा संतापजनक दावा कंपनीने केला आहे. अशा किरकोळ घटना घडत असतात, असे कंपनीचे जनसंपर्क अधिकारी अनिल व्यास यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या