सेंच्युरी रेयॉनच्या सीईओला भोसकले, कामगाराला अटक

कल्याणजवळच्या शहाड येथील सेंच्युरी रेयॉन काराखान्याच्या आवारात एका कामगाराने कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर चाकूने हल्ला करून त्यांना भोसकले. कामगाराच्या हल्ल्यात अधिकारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 10 वर्षांपासून कंपनीच्या स्टाफ क्वॉटर्समध्ये घर मिळाले नसल्याने कामगाराने हा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.

शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीचे मुख्य कार्यकरी आधिकारी ओ. आर. चितलंगे गुरुवारी दुपारी कार्यालयातून बाहेर पडण्यासाठी कारकडे जात होते. त्यावेळी अरुण मसंद हा कामगार त्यांच्याजवळ गेला. गेल्या 10 वर्षांपासून आपल्याला स्टाफ क्वॉर्टरमध्ये घर मिळाले नसल्याचे त्याने चितलंगे यांना सांगितले. चितलंगे यांनी त्याला दुसर्‍या दिवशी भेटण्यास सांगितले. त्यानंतर मसंद याने खिशातील चाकू काढून चितलंगे यांच्यावर वार करत त्यांना भोसकले. त्यावेळी जवळच असलेल्या सुरक्षा रक्षकांनी मसंदला पकडले. मसंदने केलेल्या हल्ल्यात चितलंगे यांच्या पोटात तीन जखमा झाल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. तर मसंदला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एका कामगाराला क्वॉटर्समध्ये जागा मिळत नसल्याने त्याने मु्ख्य कार्यकारी अधिकारी चितलंगे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. या हल्ल्याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. चितलंगे यांनी दुसऱ्या दिवशी भेटण्याचे सांगत कामगाराला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तरीही त्याने चितलंगे यांच्यावर हल्ला का केला याचा तपास करण्यात येत आहे. मसंद 15 वर्षांपासून कंपनीत मदतनीस म्हणून काम करत असून तो स्वभावाने शांत असल्याचे सांगण्यात आले. तो अशाप्रकारे वागेल, यावर विश्वास बसत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, स्टाफ क्वॉटर्समध्ये घर मिळाले नसल्याने तो निराश झाला असल्याचे काहीजणांनी सांगितले. याबाबत मसंदची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या