राहत्यात सोनसाखळी चोरांचा पोलिसांवर गोळीबार, एका आरोपीला अटक

राहता शहरामध्ये सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला असून आता त्यांची मजल थेट पोलिसांवर गोळीबारापर्यंत  गेली आहे. बुधवारी सोनसाखळी चोरांनी पोलिसांवर गोळीबार केल्याने एक पोलीस जखमी झाला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

श्रीरामपूर येथील सोनसाखळी चोरीच्या टोळीतील सचिन साठे आणि त्याचा साथिदारांनी बुधवारी राहता शहरात पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबारानंतर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून सचिन साठे याला अटक केली आहे.

दरम्यान, गोळीबाराची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. जखमी पोलिसावर राहाता ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शिर्डी सुपर स्पेशालिटी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या