स्मृतिगंध – क्रीडा पत्रकारितेतील चैतन्य पर्व

>>प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये क्रीडा पत्रकारितेचे जनक असा ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या पत्रमहर्षी वि. वि. करमरकर यांचे नुकतेच निधन झाले. मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये 1960 पूर्वी क्रीडा पत्रकारिता हा स्वतंत्र प्रकार आहे हे मान्यच नव्हते. क्रीडा पत्रकारिता म्हणजे हॉकी, क्रिकेटच्या बातम्या आणि अधूनमधून एखादी कबड्डी किंवा खोखोची बातमी एवढाच छोटासा व्याप होता, पण क्रीडा क्षेत्राला वाहिलेले स्वतंत्र पान ही संकल्पना करमरकरांनी सर्वप्रथम सुरू केली. पहिल्या पानावरून वार्तांकन सुरू करून थेट शेवटच्या पानावर त्याचा शेवट करावा एवढे क्रीडा पत्रकारितेचे महत्त्वाचे स्थान त्यांनी निर्माण पेले.

आधुनिक मराठी पत्रकारितेवर विलक्षण ठसा उमटवणारे आणि मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये क्रीडा पत्रकारितेचे जनक असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते पत्रमहर्षी वि. वि. करमरकर यांचे योगदान खरोखरच उल्लेखनीय म्हटले पाहिजे. खरे तर युरोप आणि अमेरिकेत 1800 सालीच क्रीडा पत्रकारितेला सुरुवात झाली होती. स्वातंत्र्यानंतर हळूहळू हिंदुस्थानी पत्रकारितेमध्ये ‘विशेषीकरण युग’ सुरू झाले. 1960 नंतर या विशेषीकरण युगाने भाषिक पत्रकारितेमध्ये प्रवेश केला. क्रीडा पत्रकारिता म्हणजे खेळाडूंच्या आणि संघांच्या कार्याचे मूल्यमापन करून त्यांच्या गुणवैशिष्टय़ांचा मूल्यभेद करणारी पत्रकारिता. त्यामध्ये खेळ, खेळाडू आणि लढणारे-झुंजणारे दोन संघ यांच्या कामगिरीचे विश्लेषण अपेक्षित असते. असे विश्लेषण करणाऱया आघाडीच्या पत्रकारांमध्ये वि. वि. करमरकर किंवा बाळ करमरकर यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. त्यांची लेखन पद्धती, निवेदन शैली आणि विश्लेषण करण्याची पद्धती यामुळे त्यांनी क्रीडा पत्रकारितेस दिलेले योगदान खरोखरीच श्रेष्ठ म्हणावे लागेल.

1960 पूर्वीची परिस्थिती

मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये 1960 पूर्वी क्रीडा पत्रकारिता हा स्वतंत्र प्रकार आहे हे मान्यच नव्हते. क्रीडा पत्रकारिता म्हणजे हॉकी आणि क्रिकेटच्या बातम्या आणि अधूनमधून एखादी कबड्डी किंवा खो-खोची बातमी एवढाच छोटासा व्याप होता. प्रारंभी नाशिकच्या ‘गावकरी’ या दैनिकात त्यांनी पाऊल ठेवले आणि तिथे त्यांचा कल क्रीडा पत्रकारितेकडे वळला. 1962मध्ये टाइम्स समूहाचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ हे वृत्तपत्र मुंबईहून सुरू झाले आणि द्वा. भ. कर्णिक यांच्याकडे संपादकाची जबाबदारी आली. त्यांच्याच तालमीत करमरकरांनी मराठीत क्रीडा पत्रकारितेची सुरुवात केली. कर्णिक आणि गो. वि. तळवळकर यांच्या तालमीत तयार झालेल्या करमरकरांनी हळूहळू व्याप वाढवला आणि क्रीडा क्षेत्रासाठी पूर्ण पानाची सुरुवात केली. 1980 च्या दशकात संपूर्ण जगभरातला तरुण वर्ग पहिल्या पानावरील बातम्यांवर नजर टाकल्यानंतर ताबडतोबीने शेवटच्या पानावरील क्रीडा क्षेत्राच्या बातम्या वाचत असे. ही बाब ओळखून करमरकरांनी मराठी वाचकांनाही जागतिक वृत्तपत्रांच्या मांडीस मांडी लावून बसवण्याचा बहुमान दिला.

त्यांनी 1960 पूर्वीचे चित्र पूर्ण बदलून टाकले आणि 1960 ते 2000 हा चार दशकांचा प्रदीर्घ काळ त्यांनी मराठी क्रीडा पत्रकारितेवर एका ताऱयाप्रमाणे गाजवला आणि त्यांचेच अधिराज्य मराठी क्रीडा पत्रकारितेवर राहिले. पूर्वीच्या रुक्ष, पंटाळवाण्या वृत्तांकनाला त्यांनी शैलीदार, वाचनीय आणि प्रभावशाली स्वरूप प्राप्त करून दिले. त्यामुळे खेळाचा मजकूर हा आनंद देणारा मजकूर असतो अशी लोकधारणा बनू लागली. काल झालेल्या सामन्यामध्ये, स्पर्धेमध्ये काय घडले याविषयी आज वृत्तपत्रात काय छापून आले आहे याविषयीची उत्पंठा त्यांनी वाचकांमध्ये निर्माण केली.

त्यांची लेखनशैली जितकी खुमासदार होती तितकेच त्यांचे बोलणेही प्रभावी होते. त्यांची भाषा अत्यंत सुबोध, रसाळ आणि आकर्षक अशी होती. दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीवरील त्यांचे समालोचन हे त्यांच्या वार्तांकनाएवढेच प्रभावी असे.

साक्षेपी पत्रकारिता

करमरकरांच्या लेखणीची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या पत्रकारितेतील साक्षेपी आणि सतमोल दृष्टी. करमरकर कुणाचेही वायफळ काwतुक करत नसत. एखाद्या खेळाडूचा फार गवगवा करून त्याला हरभऱयाच्या झाडावर चढवू नये असे त्यांचे मत होते. त्याचप्रमाणे टीका-टिप्पणी करतानाही समतोल ठेवला पाहिजे या मताचे ते होते. शांत, संयत आणि  समतोल क्रीडा पत्रकारितेचा त्यांनी मराठी भाषेमध्ये जणू आदर्शच तयार केला. त्यांचे वार्तांकन अचूक, नेमके आणि संक्षिप्त असे. त्यामध्ये यशापयशाचा लेखाजोखा मांडण्याची त्यांची पद्धती होती. असा लेखाजोखा मांडताना ते स्वतंत्र प्रज्ञेने लेखन करत असत. ते विलक्षण बुद्धिवादी आणि वस्तुनिष्ठ होते. त्यामुळे त्यांचे ‘ना खेद ना खंत’, ‘दूरवरून दृष्टिक्षेप’ यांसारखे स्तंभ अत्यंत वाचनीय ठरले. कसोटी सामना असो किंवा एकदिवसीय सामना असो, करमरकर या जय-पराजयाबद्दल काय लिहितात याकडे वाचकांचे लक्ष असायचे.

देशी खेळांचा पुरस्कार

वि. वि. करमरकरांनी क्रिकेटच नाही तर कबड्डी, खो-खो, कुस्ती या देशी खेळांना महत्त्व प्राप्त करून दिले. विशेषतः खो-खोचा खेळ इतका प्रभावी आणि गतिमान असूनही मागे पडत आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी खो-खो खेळाडूंना मोठी संधी मिळवून दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक खो-खो खेळाडूंना नोकऱया मिळाल्या. खेळाडूंच्या गुणवत्तेप्रमाणे त्यांना समाजकारणात आणि अर्थकारणात मोलाचे स्थान मिळाले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. निर्णय करणारे धोरण नियोजक आणि राजकीय नेते यांच्याशीही सुसंवाद साधून महाराष्ट्र विविध खेळांमध्ये पहिल्या स्थानावर कसा राहील याचा त्यांनी जणू ध्यासच घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात देशी खेळांना चांगले दिवस आले.

क्रीडा पत्रकारितेची परंपरा

‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये क्रीडा पत्रकारिता करतानाच करमरकरांनी 10-12 क्रीडा पत्रकारांचा एक चमू तयार केला. यामध्ये चंद्रशेखर संत, सुनंदन लेले, द्वारकानाथ संझगिरी, हेमंत जोगदेव, सुहास फडके आदींची एक मोठी मालिकाच त्यांनी तयार केली. पुढे ग्रामीण भागात त्यांच्यामुळेच क्रीडा पत्रकारांची एक परंपराच तयार झाली. क्रीडा पत्रकारितेचे शिक्षण दिले पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी आग्रही मागणी केली. करमरकरांच्या क्रीडा पत्रकारितेचे मर्म त्यांच्यातील अभ्यासू वृत्तीत होते. त्यांनी केलेले क्रिकेटचे समालोचन ऐकल्यानंतर त्यांनी रुजवलेल्या संकल्पना आणि त्यांनी वापरलेले शब्द आजही क्रिकेट समालोचनामध्ये जसेच्या तसे वापरले जातात. काळाचा प्रवाह पुढे गेला तरी मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासात बाळ करमकर यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल यात शंका नाही.