चैतन्य ताम्हाणेच्या ‘द डिसायपल’चा डबल धमाका, व्हेनिस महोत्सवात ‘क्रिटिक्स’सह सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार!

358

जगभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठीचा झेंडा डौलाने फडकला आहे. महोत्सवात चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘द डिसायपल’ ने या मराठी चित्रपटाने डबल धमाका केला आहे. शुक्रवारी फिप्रेस्कीच्या ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर काल ‘द डिसायपल’ने सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कारही पटकावला. या जागतिक यशाबद्दल चैतन्यवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. व्हेनिस महोत्सवात ‘गोल्डन लायन’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान चीन-अमेरिकी फिल्ममेकर चालो झायो यांच्या  ‘नोमाडलँड’ने जिंकला आहे.

इटलीत 2 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या व्हेनिस महोत्सवाची सांगता शनिवारी, 12 सप्टेंबर रोजी झाली. समारोपाच्या दिवशी मुख्य स्पर्धेतील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. दोनवेळा ऑस्कर पटकावणाऱया केट ब्लॅंचेट यांच्या अध्यक्षतेखालील टीमने परीक्षक म्हणून काम पाहिले. जगभरात या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग झाले. यावेळी चैतन्य ताम्हाणेच्या ‘द डिसापयल’ला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार घोषित करण्यात आला. 4 सप्टेंबरला ‘द डिसायपल’ चे स्क्रिनिंग झाले होते. त्यावेळी समीक्षकांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले होते. त्यानंतर शुक्रवारी द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिस्कने (फिप्रेस्की)या चित्रपटाला क्रिटिक्स पुरस्कारने सन्मानित केले.

द डियायपल’ या  मराठी चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल दोन दशकांनंतर व्हेनिस महोत्सवात स्पर्धा विभागात हिंदुस्थानी चित्रपटाची निवड झाली.  याआधी 2001 साली मीरा नायर यांच्या ’मान्सून वेडिंगला’ हा सन्मान मिळाला होता.

‘द डिसायपल’ चे लेखन करणं हा खूप आव्हानात्मक आणि खडतर प्रयत्न होता, असा अनुभव मी याआधी कधीच घेतला नव्हता. हा सन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण स्वतःच्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्याचे धैर्य मला यातून मिळेल. मी हा पुरस्कार संगीतकार, लेखक, संशोधक आणि इतिहासकारांना अर्पण करत आहे. या सगळ्यांनी अतुलनीय अशा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे जग आपल्यासाठी खुलं करून दिलंय.- चैतन्य ताम्हाणे, लेखक- दिग्दर्शक

अभिनंदनाचा वर्षाव

व्हेनिस महोत्सवातील यशानंतर चैतन्य ताम्हाणेकर मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुजॉय घोष, अनुराग कश्यप, रिचा चढ्ढा, अली फझल आदी अनेक बॉलिवूड मंडळींनी चैतन्यला शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही चैतन्यचे अभिनंदन केलंय. गुरुशिष्य परंपरा आणि तीन दशके हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेला गायक यांचे यथार्थ चित्रण ‘द डिसायपल’ या चित्रपटात आहे. चैतन्यला मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन असं ट्विट जावडेकर यांनी केलंय.

आपली प्रतिक्रिया द्या