उद्यापासून चैत्र नवरात्रोत्सव ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, ठाण्यात साकारले दिल्लीचे अक्षरधाम मंदिर

जांभळी नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दिल्लीचे अक्षरधाम मंदिर साकारले आहे. चित्रनगरीतील शंभरहून अधिक कलाकारांनी त्यासाठी मेहनत घेतली असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बुधवार 22 मार्चपासून सुरू होणाऱया चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हे मंदिर उभारले असून नऊ दिवस भजन, कीर्तन, होम हवन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने कला, भक्ती महोत्सव होणार आहे.

चैत्र नवरात्रोत्सवासाठी आनंद चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजन विचारे यांनी आज तयारीचा आढावा घेतला.नऊ हवनकुंडदेखील बनवण्याचे काम सुरू असून चौकाचा परिसर दाक्षिणात्य शैलीचा वापर करून सुशोभित करण्यात आला आहे.

मुख्य मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला गजमुखाचे दर्शन होईल. प्रधानाचार्य मुकुंदशास्त्र्ााr मुळे (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग केला जाणार आहे. बुधवारी कळवा येथून देवीचे वाजतगाजत आगमन होईल. दादूस आला रे, निवृत्ती इंदुरीकर यांचे कीर्तन, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्याचे कार्यक्रम, मराठमोळा दांडिया होणार आहे. या दांडियास होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली.