चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, महामानवाला लाखो अनुयायांचे अभिवादन

180

हिंदुस्थानच्या घटनेचे शिल्पकार, ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर अक्षरशः भीमसागर उसळला. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱयातून लाखोंच्या संख्येने आलेल्या अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

डोक्यावर निळी टोपी, गळय़ात निळे उपरणे आणि छातीवर बाबासाहेबांचा फोटो लावलेले अनुयायांचे जथे ‘जय भीम’च्या घोषणा देत सकाळपासूनच चैत्यभूमीच्या दिशेने जात होते. त्यामुळे दादर स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंतच्या परिसरात निळा भीमसागर उसळल्याचे चित्र होते. कोणतीही गडबड-गोंधळ न करता प्रत्येकाने स्वयंशिस्तीचे दर्शन घडवले. तसेच ठिकठिकाणी स्वयंसेवक तैनात असल्याने नागरिकांची कोणतीही गैरसोय झाली नाही.

पालिकेकडून चोख व्यवस्था
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेने ठिकठिकाणी मदत कक्ष सुरू केले होते. तसेच पिण्याचे पाणी, शौचालये उपलब्ध करून दिली होती. त्याचबरोबर अनुयायांना बसण्यासाठी भव्य छत उभारण्यात आले होते. वैद्यकीय मदत पथक, रुग्णवाहिका आदी तैनात ठेवण्यात आले होते.

सामाजिक संस्थांकडून अल्पोपाहाराचे वाटप
देशाच्या कानाकोपऱयातून आलेल्या अनुयायांसाठी विविध सामाजिक संस्थांकडून अल्पोपाहार आणि पिण्याच्या शुद्ध पाण्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर राज्यातील दूध उत्पादक संघांची शिखर संस्था असलेल्या महानंद डेअरीच्या वतीने मसाला छास, फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

रेल्वेकडून दिवसभर उद्घोषणा
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून आलेल्या अनुयायांसाठी रेल्वेने जादा गाडय़ा सोडल्या होत्या. त्याचबरोबर चैत्यभूमीकडे कसे जाता येईल याबाबत मार्गदर्शन करणाऱया उद्घोषणा दिवसभर सुरू होत्या.

बाबासाहेबांची दुर्मिळ छायाचित्रे पाहण्यासाठी गर्दी
पालिकेच्या वतीने बाबासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. याआधी कधीही न पहिलेलीली ही दुर्मिळ छायाचित्रे पाहण्यासाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती.

बाबासाहेबांवरील पुस्तके, पुतळय़ांच्या खरेदीसाठी झुंबड
चैत्यभूमी परिसरात आज ठिकठिकाणी बाबासाहेबांवरील पुस्तकांचे आणि छोटय़ा पुतळय़ांचे स्टॉल लागले होते. त्याच्या खरेदीसाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. तसेच बाबासाहेबांचे वेगवेगळय़ा धातूचे छोटे पुतळे विक्रीसाठी होते. ते पाहण्यासाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर बाबासाहेबांचे फोटो असलेले पेन, किचेन, स्टिकर आणि बॅजचीही विक्री जोरात सुरू होती.

राज्यपाल व मुख्यमंत्र्यानी केले अभिवादन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख- आमदार आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी राज्यमंत्री सचिन अहिर आदी उपस्थित होते.

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील ज्या ‘बीआयटी’ चाळीत वास्तव्य होते त्या खोलीला भेट दिली. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या