‘चला हवा येऊ द्या’मध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा अपमान, विक्रेते संतप्त

2418

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात विनोदाच्या नावाखाली वृत्तपत्र विक्रेत्यांचा अपमान करण्यात आला असून असून याप्रकरणी झी मीडियाने तत्काळ माफी मागावी, अशी मागणी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने आज केली. तसेच 15 ऑगस्ट रोजी झी मीडियाच्या कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

4 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेल्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात ‘दोन रुपयांचे वृत्तपत्र’ असा हेटाळणीपर डायलॉग मारून वृत्तपत्रांचा आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचा अवमान करण्यात आला. याची गंभीर दखल बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने घेतली आहे. महाराष्ट्राला विनोदाची गौरवशाली परंपरा असताना कष्टकरी विक्रेत्यांचा अपमान करण्याइतकी विनोदाची दिवाळखोरी निर्माण झाली का, असा संतप्त सवाल विक्रेता संघाने केला. विक्रेते ऊनपावसाची पर्वा न करता; दंगल किंवा अतिवृष्टी असो, वर्षभर इमानेइतबारे कष्ट करून पैसे कमवतात. अनेक जण वृत्तपत्रांचे वाटप करून मोठे झाले आहेत. वृत्तपत्रे चांगला माणूस घडवण्याचे आणि लोकशाही समृद्ध करण्याचे काम करतात. असं असताना वृत्तपत्रांना कवडीमोल ठरवून त्यांची निंदा करणं दुर्दैवी आहे, असे विक्रेत्या संघाने आपल्या निवेदनात म्हटलंय.

याप्रकरणी झी मीडियाने चूक कबूल करावी किंवा वृत्तपत्र विक्रेते आणि वृत्तपत्रांबद्दल सकारात्मक कार्यक्रम दाखवावा अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे. स्वातंत्रदिनी सायंकाळी 6 वाजता झी मीडियाच्या कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वृत्तपत्र पूर्ण सुरक्षित
वृत्तपत्र हा कोरोनाचा वाहक नाही. देशाच्या गृहमंत्र्यांपासून महानायक अमिताभ बच्चन, ब्रिटनचे पंतप्रधान अशा जगातील कोणत्याही व्यक्तीला कोरोना होऊ शकतो. मग वृत्तपत्र विक्रेत्याची अशी हेटाळणी का, असा सवाल विक्रेत्यांनी केला. वृत्तपत्र सुरक्षित आहेत असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनेही सांगितले आहे, याचा पुनरुच्चारही विक्रेता संघाने केला.

आपली प्रतिक्रिया द्या