‘चला हवा येऊ द्या’ विरोधात संतापाची लाट, संभाजीराजेंनी दिला कलाकारांना इशारा

9699

छोट्या पडद्यावरील विनोदी मालिका ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यावर आक्षेप घेण्यात आला असून राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमाचा एक भाग नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये महाराज सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा मुळ फोटो फोटोशॉप करण्यात आला असून त्याला विनोदी अंगाने दाखवण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमातील कलाकार, निर्माते आणि झी वाहिनी विरोधात संताप व्यक्त केला जात असून झालेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागण्याची मागणी होत आहे. कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही याची दखल घेत ‘माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करू’, असा इशारा दिला आहे.

लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे. निलेश साबळे तसेच झी वाहिनीने या गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा संभाजीराजे भोसले यांनी फेसबुक पोस्ट शेअऱ करून दिला आहे.

आमचे घराणे हे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरी मध्ये रूपांतरित केले होते. सयाजीराव गायकवादांचे योगदान ही काही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची आणि पोषक वातावरणाची गरज असते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काहीही करावं. आम्हा सर्व इतिहास प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही संभाजीराजे भोसले यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे नमूद केले आहे.

नेटकऱ्यांचा संताप
संभाजीराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्रातील तमाम जनतेने सोशल मीडियाद्वारे या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे. नेटकऱ्यांनी चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील कलाकार, निर्माते आणि झी वाहिनी यांच्यावर टीकेचे आसूड ओढले आणि माफीची मागणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या