चाळीसगाव हादरलं! दुसरी मुलगी झाल्याच्या रागात पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

चाळीसगाव शहरातील 28 वर्षीय युवकाने दारूच्या नशेत पत्नीची हत्या करून स्वतः रेल्वेखाली आत्महत्या केल्याने चाळीसगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील रेल्वे लाईन लगत राहत असलेल्या सुरज दिलीप कुऱ्हाडे या युवकाने दुसरीही मुलगी झाल्याचा राग डोक्यात घेऊन स्वतःच्या पत्नीची हत्या केली आहे. दारूच्या नशेत पत्नीची हत्या झाल्याचे लक्षात येताच सुरजनेही रेल्वेखाली आत्महत्या केली आहे.

सुरज नेहमी दारूच्या नशेत घरी येतं असल्यामुळे सुरज कुऱ्हाडे आणि रेश्मा कुऱ्हाडे यांच्यात वाद होत असे. हे दोघेही पती पत्नी खड्डे खोदण्याचे काम करत होते. सुरज आणि रेश्माला दुसरीही मुलगी झाली. दुसरी मुलगी झाल्याचा राग सुरजच्या डोक्यात होता. माहेरी गेलेल्या रेश्माला सुरज नुकताच घरी घेऊन आला होता. आज सकाळी मुलीच्या रडण्याचा आवाज शेजारच्या लोकांना आला,त्यांनी घरात डोकावून पहिल्यानंतर रेश्मा ही रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेली होती. शेजारी राहत असलेल्या नातेवाईकांनी घडलेला प्रकार मुलीच्या कुटुंबियांना सांगितला.

मुलीच्या कुटुंबियांनी घटना स्थळी धाव घेतल्यानंतर सूरज त्या ठिकाणी नव्हता. दुसरीकडे रेल्वे लाईन वर एका इसमाने आत्महत्या केल्याचे वृत्त नातेवाईकांच्या कानावर पडले. चौकशी केली असता सूरजने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. सुरजने आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली अशी तक्रार मयत रेशमाचा भाऊ प्रताप गायकवाड याने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार मयत सुरज कुऱ्हाडे याच्यावर 302 खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.