नव्या- कोऱ्या 65 हजाराच्या स्कूटीला एक लाखाचा दंड!

1339

देशभरात नवीन वाहन कायदा लागू झाल्यानंतर जनतेकडून याविरोधात रोष व्यक्त होत आहे. मात्र, या कायद्यानुसार आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या अनेक गोष्टीही समोर येत आहेत. आता शोरुममधून नुकत्याच बाहेर काढलेल्या नव्या-कोऱ्या 65 हजाराच्या स्कूटीवर एक लाखाचा दंड आकारण्यात आला आहे. ही स्कूटी नुकतीच शोरुममधून बाहेर काढण्यात आल्याने त्यावर नंबरप्लेट नव्हती. ओडिशातील भुवनेश्वरमध्ये घडली आहे.

कटक तपासणी नाक्याजवळ स्कूटी चालवणाऱ्या अरुण पांडा यांना वाहतूक अधिकाऱ्यांनी 12 सप्टेंबरला अडवले. स्कूटीचा रजिस्ट्रेशन नंबर नसल्याने आरटीओकडून त्यांना एक लाखांचा दंड आकारण्यात आला. मात्र, या दंडाचे चलान डीलरच्या नावाने बजावण्यात आले आहे. ही स्कूटी 28 ऑगस्टला कविता पांडा यांच्या नावे खरेदी करण्यात आली होती. खरेदी केल्यावर शोरूमकडून रजिस्ट्रेशन नंबर देण्यात आला नाही, असे कविता यांनी सांगितले. वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड बजावण्यात आला आहे. कोणत्याही कागदपत्रांशिवाय स्कूटी विकण्यात आल्याप्रकरणी भुवनेश्वरच्या आरटीओ अधिकाऱ्यांनी डीलरचे ट्रेड लायसन्स रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. वाहन कायद्यानुसार वाहन विक्री करण्यापूर्वी नोंदणी क्रमांक, विमा आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र खरेदीदारांना देणे बंधनकारक आहे, असे आरटीओ अधिकारी दिप्ती रंजन यांनी सांगितले.

ओडिशात संबलपूरमध्ये याआधीही एका ट्रकला 6 लाख 53 हजार 100 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. हा ट्रक नागालँडचा होता आणि ट्रक मालकाने जुलै 2014 ते सप्टेंबर 2019 पर्यंतचा कर भरला नव्हता. त्यामुळे हा दंड आकरण्यात आला आहे. नव्या वाहतूक कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई करून दंड आकारण्यात येत आहे. अनेकदा दंडाची रक्कम वाहनाच्या किंमतीपेक्षा जास्त असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, नियम तोडणारे राजकीय नेते आणि पोलिसांनाही दंड भरावा लागत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी चंदीगड पोलिसांच्या वाहनावर दंड आकारला होता.

आपली प्रतिक्रिया द्या