साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या उमेदवारीला न्यायालयात आव्हान

sadhvi-pragya-singh-thakur

सामना ऑनलाईन । भोपाळ

भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या या उमेदवारीला मालेगाव बॉम्बस्फोट पीडिताच्या वडिलांनी एनआयए कोर्टात आव्हान दिले आहे. तब्येतीचे कारण पुढे करत ठाकूर यांनी जामीन मिळवला होता. याबाबतची याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.

नासीर अहमद बिलाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील लढत रोमहर्षक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते तहसीन पूनावाला यांनी प्रज्ञा ठाकूर यांना निवडणूक लढवण्याला मनाई करण्याचे आदेश द्यावेत असे पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे.

भाजप प्रवक्त्यावर बूट फेकला

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना दिलेल्या उमेदवारीबाबत माहिती देण्यासाठी आज भाजपचे प्रवक्ते जीवीएल नरसिम्हा  राव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका व्यक्तीने बूट फेकल्याची घटना घडली. या व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी तातडीने ताब्यात घेतले. या व्यक्तीचे नाव शक्ती भार्गव असून पेशाने ते डॉक्टर आहेत. सरकारने भ्रष्टाचाराविरोधात कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप  भार्गव यांनी केला आहे.

काँग्रेस हिंदूविरोधी – साध्वी

काँग्रेस हिंदूविरोधी असून हिंदूचा संबंध ते दहशतवादाशी जोडत आहे असा आरोप साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला आहे. आपला तुरुंगात कशा प्रकारे अनन्वित छळ केला याबाबत मी जनतेमध्ये जाऊन सांगणार असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. दिग्विजय याबाबत पुरावे मागत आहेत. त्यांना जरूर पुरावे देऊ असेही ठाकूर यांनी म्हटले असून येणाऱ्या काळात एखाद्या महीसोबत असे होणार नाही यावर मी कसा विश्वास ठेवू, असा सवालही त्यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जामिनावर आहेत त्यामुळे त्यांना मला विचारण्याचा अधिकार नाही असेही त्या म्हणाल्या.

साध्वी  प्रज्ञासिंह यांना शिवसेनेने सातत्याने पाठिंबा दिला

मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना शिवसेनेने सातत्याने पाठिंबा दिला आहे, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून निवडणूक रिंगणात उतरविले आहे, या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर नाशिकमध्ये केस सुरू असताना शिवसेनेने पहिल्या दिवसापासून त्यांना पाठिंबा दिल्याचेही ते यावेळी म्हणाले.