झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि मंत्री चंपई सोरेन हे येत्या 30 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर सोरेन यांनी हा निर्णय घेतला. सोरेन यांच्या या निर्णयानंतर तत्काळ गृहमंत्रालयाने त्यांना झेड प्लस सुरक्षा लागू केली आहे.
माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी काही दिवसांपूर्वी ‘अपमान’ असा उल्लेख केला होता. या घोषणेपूर्वी चंपाई सोरेन यांनी JMM नेतृत्वाबाबत नाराजीचे संकेत दिले होते. पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या नकळत अचानकपणे सरकारी कार्यक्रम रद्द केल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर येताच त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्री झाले.
सोरेन यांनी काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर हा निर्णय झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवर पोस्ट लिहून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 30 ऑगस्टला चंपाई सोरेन यांच्यासोबत झारखंड मुक्ती मोर्चाचे अनेक नेते भाजपमध्ये सामील होतील असेही सांगितले जात आहे.
आसामचे मुख्यमंत्री बिस्वा सरमा यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या प्रतिष्ठित आदिवासी नेते चंपाई सोरेन यांनी काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. रांचीत 30 ऑगस्टला सोरेन भाजपमध्ये सामील होतील असेही सरमा यांनी म्हटले आहे.