निकहत, नितू सुवर्णसमीप !

विद्ममान चॅम्पियन निकहत झरीन व सुपर फॉर्ममध्ये असलेली नितू घंघास यांनी अपेक्षेप्रमाणे गुरुवारी जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली. आता दोघीही सुवर्णपदकापासून केवळ एक पाऊल दूर आहेत. अवघ्या देशवासीयांच्या नजरा त्यांच्या पदकाच्या रंगाकडे खिळलेल्या असतील.

निखत झरीनने 50 किलो गटातील उपांत्य लढतीत रियो ऑलिम्पिकमधील कास्यपदक विजेत्या कोलंबियाच्या इंग्रिट लोरेना हिचा 5-0 गुणफरकाने फडशा पाडत दिमाखात अंतिम फेरी गाठली. हिंदुस्थानी खेळाडूने चपळता आणि तंत्रशुद्ध खेळाची योग्य सांगड घालत हा विजय मिळविला. नितू घंघासने 48 किलो गटातील चुरशीच्या उपांत्य लढतीत कझाकिस्तानच्या अलुआ बाल्कीबेकोवा हिचा 5-2 असा पराभव करत आगेकूच केली. नितू पहिल्या फेरीत 2-3 अशी पिछाडीवर पडली होती. मात्र अखेरच्या 3 मिनिटांत तिने जबरदस्त पुनरागमन करीत विजयाला गवसणी घातली. ही लढत इतकी चुरशीची झाली की, पंचांना रिप्लाय बघून निकाल द्यावा लागला.