विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू होणार आहेत. मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमित गणवेश आणि स्काऊट गाईडच्या गणवेशाचा प्रत्येकी एक संच मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. 10 जून तारीख उलटली तरी बचत गटांकडे गणवेशाचे कापड पोहोचलेले नाही. अद्याप विद्यार्थ्यांची मापेदेखील घेतलेली नाहीत. त्यामुळे हे गणवेश शिवून कधी होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया गणवेश योजनेत यंदा बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना यंदा नियमित गणवेशाचा एक संच आणि स्काऊट-गाईड गणवेशाचा एक संच पुरविण्यात येणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत नियमित गणवेशाचे दोन संच पुरविण्यासाठी प्रति गणवेश 300 रुपयांप्रमाणे अनुदान शाळा व्यवस्थापन समितीला दिले जात होते. त्यानुसार दरवर्षी नवीन सत्रात शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वितरित केले जायचे. या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित सुरू असताना यंदा मात्र या योजनेत विनाकारण बदल केला, असा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केला आहे. स्काऊट-गाईडचा गणवेश शिवून देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे म्हणजेच मुख्याध्यापकाकडे देण्यात येऊ नये, अशी मागणीही समितीने राज्याचे प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांच्याकडे केली आहे.
- गणवेश शिलाईसाठी एकत्रितपणे मोठय़ा प्रमाणात काम मिळाल्याने महिला बचत गटांनी 100 रुपयांत शालेय गणवेश शिवून देण्याचे मान्य केले. मात्र काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अतिशय तुटपुंजी आहे. शाळेत दहा विद्यार्थीदेखील नाहीत. त्यामुळे 100 रुपयांत मुलांसाठी हाफ पॅण्ट, शर्ट, फुल पॅण्ट आणि शर्ट तसेच मुलींसाठी सलवार कमीज, स्कर्ट शिवून देणे शक्य नसल्याचे बचत गटांचे म्हणणे आहे.
गणवेश योजनेतील अडचणी समजून घ्या
गणवेश योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱया अडचणी समजून घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे राज्य अध्यक्ष विजय काsंबे आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केली आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना योग्य मापाचे गणवेश शाळेच्या पहिल्या दिवशी 15 जून आणि विदर्भात 1 जुलैपूर्वी वितरित होण्याची कार्यवाही करावी. तसेच स्काऊट गाईडचे गणवेशसुद्धा नियमित गणवेशाप्रमाणे शिलाई करूनच शाळांना मिळावेत, असेही समितीने स्पष्ट केले आहे.
- शाळांना स्काऊट-गाईड गणवेशाचे कापड पुरविले जाणार आहे. प्रति गणवेश शिलाईसाठी 100 रुपये व अनुषंगिक खर्चासाठी प्रति गणवेश 10 रुपये अनुदान मिळणार आहे.
- महिला बचत गटाच्या कारागिरांनी प्रत्येक विद्यार्थी/ विद्यार्थिनींची मापे घेऊन मापांनुसार गणवेश शिलाई करून द्यायचे आहेत.
- अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांची मापेच घेतलेली नाहीत. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना योग्य मापाचे नियमित गणवेश कसे मिळतील असा प्रश्न आहे.
- तसेच अंदाजे मापे गृहीत धरून गणवेश शिलाई केल्यास आणि विद्यार्थ्यांना योग्य मापाचा गणवेश न मिळाल्यास पालकांच्या रोषाला शिक्षकांनी सामोरे जायचे का, असा प्रश्नदेखील आहे.