‘छंद प्रितीचा’ चित्रपटातून नवे शाहीर प्रेक्षकांच्या भेटीला

सामना ऑनलाईन । मुंबई

शाहिरांची कवनं महाराष्ट्राची संस्कृती असणाऱ्या लोकसंगीताचा एक महत्त्वाचा भाग आहेत. या कवनांनी एकेकाळी मराठी मनावर राज्य केले होते. यथावकाश मराठी चित्रपटांचे विषय बदलले आणि शाहिरी गीतांची जागा पाश्चात्य संगीताने घेतली. बराच काळ लोटला आणि आता पुन्हा एकदा लावणी मराठी सिनेसृष्टीत डोकावली आहे. याच दिशेने एक पाऊल पुढे टाकत ‘प्रेमला पिक्चर्स’चे निर्माते चंद्रकांत जाधव आणि दिग्दर्शक एन. रेळेकर यांनी लोककलांची गाथा सांगणारा संगीतमय चित्रपट ‘छंद प्रितीचा’ची निर्मिती केली आहे.

‘छंद प्रितीचा’ मध्ये सुबोध भावे दिसणार नवीन रुपात

कलेची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटातून हर्ष कुलकर्णी हा नवीन अभिनेता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. लोकगीतांचा वारसा लाभलेल्या या चित्रपटात तो एका शाहिराच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्याच्या शब्दांमध्ये जादू आहे. लावण्या, लोकगीतं, सवाल–जवाब, भावगीतं आणि भक्तीगीतं अशी सगळ्याच प्रकारची काव्य लिहिणारा हा शाहीर, मराठी मुलखात आपलं नाव व्हावं या एका अपेक्षेने घरदार सोडून आपल्या स्वप्नपूर्तीच्या वाटेवर निघतो. या वाटेवर शाहीर सत्यवानासाठी फुलं पेरली आहेत की काटे रोवले आहेत हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

संगीताची लयलूट करणारा चित्रपट ‘छंद प्रितीचा’

‘छंद प्रितीचा’ चित्रपटात हर्ष कुलकर्णी बरोबर सुबोध भावे, सुवर्णा काळे आणि विकास समुद्रे प्रमुख भूमिकेत दिसणार असून शरद पोंक्षे, गणेश यादव, सुहासिनी देशपांडे, अभिषेक कुलकर्णी आणि विशाल कुलथे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. एन. रेळेकर यांनी दिग्दर्शनाबरोबरच कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन केले आहे. या चित्रपटातील महत्त्वाचा भाग म्हणजे संगीत. प्रविण कुंवर यांनी संगीतबध्द केलेल्या गीतांना बेला शेंडे, आदर्श शिंदे, जावेद अली, केतकी माटेगावकर, वैशाली सामंत आणि नंदेश उमप यांचे सुरेल स्वर लाभले आहेत. १० ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या