संगीताची लयलूट करणारा चित्रपट ‘छंद प्रितीचा’

सामना ऑनलाईन । मुंबई

इंद्रपुरीच्या मेनका आणि रंभा, तुजपुढे काय त्यांचा टेंभा… चंद्रिके काय त्यांचा टेंभा… चित्रपटाची कथा, पटकथा आणि कलाकारांच्या अभिनयाबरोबरच जेव्हा दर्जेदार संगीताचा साज एखाद्या चित्रपटाला चढतो तेव्हा त्या चित्रपटाची शान काही औरच असते. अशाच दर्जेदार गीतांनी नटलेला चित्रपट म्हणजे ‘छंद प्रितीचा’ १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. लावण्या, लोकगीतं, सवाल-जवाब, भावगीतं, भक्तीगीतं अशा सगळ्याच काव्य प्रकारांत तरबेज शाहीराच्या लेखणीची जादू ‘छंद प्रितीचा’ चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

‘छंद प्रितीचा’ चित्रपटातून नवे शाहीर प्रेक्षकांच्या भेटीला

कलेवरील प्रेमाखातर वडिलोपार्जित संपत्तीची आशा सोडून आपले आयुष्य कलेला वाहून घेणाऱ्या शाहीराची ही कथा आहे. यात त्याच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतांवर तितक्याच ताकदीचं नृत्य करणारी चंद्रा त्याला भेटते आणि दोन कलाप्रेमींमध्ये जडलेल्या प्रितीला एक वेगळं वळण लागतं. या एकंदर प्रवासात एकापेक्षा एक लोकगीतांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

चित्रपटामध्ये जावेद अली आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरांनी सजलेलं ‘आलं आभाळ भरूनं’ हे प्रेमगीत तर ‘निस्ती दारावर टिचकी मार’, ‘वाजो पहाटेचे पाच’, ‘सत्य सांगते’ या बेला शेंडे यांच्या आवाजातील फटाकेबाज लावण्या. त्याचबरोबर बेला शेंडें-वैशाली सामंत यांच्यात रंगलेला सवाल-जवाब आणि आदर्श शिंदे यांच्या आवाजातील ‘कोसळली ती वीज’ हे गीत आणि आदर्श शिंदेच्या आवाजाने नटलेली ‘शाहीरी लावणी’ अशा अनेक लोकगीतांनी नटलेला हा चित्रपट आहे. चित्रपटामध्ये आठ गाणी आहेत. एन. रेळेकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या या गीतांना प्रविण कुवर यांचे सूर लाभले आहेत. एन. रेळेकर यांनी गीतलेखनाबरोबरच कथा-पटकथा-संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

‘छंद प्रितीचा’ चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा संपन्न

चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत विकास समुद्रेंना पाहता येणार आहे. त्याचबरोबर शरद पोंक्षे, गणेश यादव, सुहासिनी देशपांडे, अभिषेक कुलकर्णी आणि विशाल कुलथे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या