चंद्रकांत पाटील यांनी ‘मातोश्री’वर घेतली उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट

सामना प्रतिनिधी । मुंबई

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. सुमारे दीड तासाच्या या भेटीत या दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दुपारी साडेबाराच्या सुमारास चंद्रकांत पाटील ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचले. विद्यार्थी संघटनेत काम करत असल्यापासून माझा उद्धव ठाकरे यांच्याशी माझा परिचय असल्यामुळे अनेक विषयांवर आम्ही चर्चा केली असे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. नारायण राणे यांच्या विधान परिषद निवडणुकीबाबत या भेटीत चर्चा झाली का, असे पत्रकारांनी यावेळी पाटील यांना विचारले. त्यावर नकारार्थी उत्तर देतानाच राणेंबद्दल चर्चा करण्याइतका मी मोठा नेता नसून त्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, मी फक्त मला नेमून दिलेले काम करतो, इतर कामांमध्ये ढवळाढवळ करत नाही, असे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील रस्त्यांवरील खड्डय़ांचा पाहणी दौरा मी केला होता. त्याबाबत उद्धव ठाकरे यांना माहिती दिल्याचे पाटील यांनी सांगितले. उद्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री दोघेही पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱयावर जात असल्याने विमानाने एकत्र जाऊ अशी विनंती उद्धव ठाकरेंना केली, परंतु वेळ जुळत नसल्याने ते शक्य नाही असे पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या