सरकार दुष्काळ निवारणासाठी सज्ज; चंद्रकांत पाटील यांची माहिती

सामना ऑनलाईन । मुंबई

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. आतापर्यंत चार हजार 331 गावे व 9 हजार 470 वाडय़ांना 5 हजार 493 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत दुष्काळ निवारणासाठी 4412 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. हवामान खात्याने पाऊस जूनच्या मध्यापर्यंत येईल असा अंदाज वर्तवला असला तरी 30 जूनपर्यंत जरी पाऊस लांबला तरी सरकार दुष्काळ निवारणासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हवामान खात्याने यंदा पाऊस उशिरा सुरू होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्रालयात दुष्काळ निवारणासंबंधीच्या उपसमितीची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळ निवारणासाठीच्या उपाययोजनांची माहिती दिली. राज्यातील 4 हजार 331 गावे व 9 हजार 470 वाडय़ांना 5 हजार 493 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मागणीनुसार टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. पिकांच्या नुकसानीपोटी राज्यातील 67 लाख शेतकऱ्यांना 4 हजार 412 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. सर्व जिह्यांतील पालकमंत्र्यांना जिह्यांमध्ये दौरे करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यांच्या दौऱ्यानंतर आलेल्या सूचनांचा विचार करून निर्णय घेण्यात येत आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

मोठय़ा जनावरांसाठी 100 रुपये अनुदान

चारा छावण्यांतील जनावरांसाठी लागणाऱ्या वैरणाची खरेदी व त्यावरील वाहतुकीचा खर्च तसेच मोठय़ा जनावरांसाठी प्रतिदिवस 18 किलो हिरवा चारा व आठवडय़ातून तीन दिवस 1 किलो पशुखाद्य आणि लहान जनावरांसाठी 9 किलो हिरवाचारा व लहान जनावरांसाठी 1 किलो पशुखाद्य देण्यात येत आहे. चारा छावण्यातील जनावरांच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून प्रति जनावर आता 90 रुपयांऐवजी 100 रुपये अनुदान मिळणार आहे अशी माहिती पाटील यांनी दिली.

1417 चारा छावण्यांत 39 हजार जनावरे

सध्या राज्यात 1417 चारा छावण्या सुरू असून त्यामध्ये 9 लाख 39 हजार 372 पशुधन आहे. या पशुधनासाठी मोठय़ा जनावरांना प्रतिदिवस 18 किलो हिरवा चारा व आठवडय़ातून तीन दिवस 1 किलो पशुखाद्य आणि लहान जनावरांना 9 किलो हिरवा चारा व 1 किलो पशुखाद्य देण्यात येते. पशुधनासाठी पाणी आणणे, लांब अंतरावरून चारा आणणे यासाठी वाहतूक खर्च वाढत असल्यामुळे चारा छावणी चालकांना देण्यात येणाऱ्या अनुदानात दहा रुपये वाढ करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे मोठय़ा जनावरांना 70 रुपये तर लहान जनावरांना 30 रुपये अनुदान आहे. मात्र, राज्यातील परिस्थिती पाहून वाढीक अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत चारा छावण्यांसाठी संभाजीनगर विभागासाठी 111 कोटी, पुणे विभागासाठी 4 कोटी व नाशिक विभागासाठी 47 कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे.