भाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर

48

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाने राज्य नेतृत्वांमध्ये बदल केले आहेत. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या जागी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागली. रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

प्रदेशाध्यक्षासह मुंबई भाजप अध्यक्षही बदलण्यात आला असून आता ही जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याआधी या पदावर आशिष शेलार हे कार्यरत होते. फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदावर निवड झाल्यानंतर शेलार यांच्या जागी नवीन नावाची चर्चा सुरू झाली होती.

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशमध्येही राज्य नेतृत्वात बदल करण्यात आले असून योगी सरकारमधील परिवहन मंत्री स्वतंत्र देव सिंह यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यूपीत याआधी डॉ. महेंद्रनाथ पांडेय यांच्याकडे प्रदेशाध्यपदाची जबाबदारी होती. लोकसभा निवडणुकीनंतर मोदींच्या मंत्रिमंडळात निवड झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून अनेक नावांची चर्चा होती. अखेर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्वतंत्र देव सिंह यांच्या नावावर मोहोर उमटवली.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बदल
काही महिन्यांवर आलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या राज्यातील नेतृत्वात बदल करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. तेव्हापासूनच ते प्रदेशाध्यक्षपद सोडतील अशी चर्चा सुरू होती. अखेर मंगळवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

आपली प्रतिक्रिया द्या