पाऊले चालती निसर्गाची वाट

ट्रेकिंग हा लहानथोरांना आपलासा वाटणारा विषय आहे. अनेकांमध्ये ट्रेकिंगमुळे निसर्गाची, प्रवासाची ओढ जागृत होताना दिसत आहे. ट्रेकिंग म्हणजे फक्त फिरणे, मौज नसून त्या ठिकाणांमागील इतिहास, निसर्गाचे महत्त्व जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

दहिसर येथील चंद्रकांत साटम यांना तब्बल 45 वर्षे ट्रेकिंगचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतः ट्रेकिंग करत असताना इतरांसाठीही ट्रेक आयोजित करण्यास सुरुवात केली. अनेकांमध्ये ट्रेकिंगची आवड त्यांनी निर्माण केली.

लोकांमध्ये निसर्गाबद्दलचे प्रेम वाढावे, यासाठी त्यांनी ‘जिजाऊ प्रतिष्ठान’ या ट्रेकिंग ग्रुपची सुरुवात केली. सर्व ट्रेकिंगप्रेमींसाठी  हक्काचा ग्रुप चंद्रकांत साटम यांच्या नेतृत्वाखाली तयार झाला. ‘जिजाऊ प्रतिष्ठान’ ट्रेकिंग ग्रुपने आतापर्यंत सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये व हिमालयात अनेक ट्रेक्स केले आहेत. सह्याद्रीतील राजगड, रायगड, सिंहगड, पुरंदर, वज्रमाळ, लिंगाणा, तोरणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व हिमालयातील चंद्रखाणी, एव्हरेस्ट बेस पॅम्प असे बरेच ट्रेक्स यशस्वीरीत्या पूर्ण केलेत. या ट्रेक्ससोबतच, ‘नॅशनल असोशिएशन फॉर ब्लाइंड्स’ (इंडिया) या संस्थेतील अंध मुलांसाठी गेली दहा वर्षे सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील विविध गडकिल्ल्यांवर ट्रेक्सचे आयोजन करण्यात येते. अंध मुलांनामध्ये ट्रेकिंगची, निसर्गाची, इतिहासाची, आवड निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांच्यासाठी हा खास उपक्रम राबवला. आजपर्यंत या मुलांना ‘जिजाऊ
प्रतिष्ठान’ संस्थेसोबत राजगड, सिंहगड, पुरंदर, रायगड, प्रतापगड, रोहिडा, रायरेश्वर असे गडकिल्ले, त्यांचा इतिहास, त्या किल्ल्यांच्या आजूबाजूचा परिसर, निसर्ग, विविध वनस्पती, फुले, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करत एक वेगळा अनुभव प्राप्त करण्याची उत्तम संधी मिळाली. दरवर्षी वर्षाऋतूमध्ये या ट्रेकचे आयोजन केले जाते.

या सामाजिक उपक्रमासाठी नॅशनल असोशिएन फॉर ब्लाइंड्स या संस्थेने ‘जिजाऊ प्रतिष्ठान’ला सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविले आहे. तसेच या अंध मुलांसाठी साहस शिबिरांचेदेखील आयोजन करण्यात येते. ज्यामध्ये रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, रॉक क्राईबिंग इत्यादी गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रभावित होऊन आम्ही समाजाप्रती असलेला खारीचा वाटा उचलावा व या दृष्टीबाधित मुलांसाठी ट्रेकिंगचे आयोजन करावे, त्यांना गौरवशाली इतिहास कळावा. इतिहासातील महत्त्वाच्या स्थळांना त्यांनी स्वतः भेट द्यावी, तो इतिहास जाणावा, तो भूगोल अभ्यासावा, राजांची राजनीती अनुभवावी यासाठी आमचा सदैव प्रयत्न असतो, असे चंद्रकांत साटम यांनी सांगितले.

  • मानसी पिंगळे, म. ल. डहाणूकर कॉलेज