कोरडं गाव होतंय जलमय; तब्बल पन्नास वर्षांनी लागलं विहिरीला पाणी, अन गावात विहीर खोदण्याची स्पर्धा सुरू…

सातत्याने होणारी जलपातळीची घट जगाची चिंता वाढविणारी ठरली आहे. अश्यातच चंद्रपूरातून एक दिलासादायक बातमी आहे. एक कोरडं गाव आता जलमय होताना दिसत आहे. वस्ती बसल्यापासून इथं पाण्याची मरमर होती. मात्र, एकाने विहीर खोदली अन तिथं पाणी लागलं. विहिरीला पाणी लागलं हे कळताच वस्तीत आनंदाला जणू उधाण आले. मग काय..? विहीर खोदण्याची स्पर्धाच सुरू झाली. अवघ्या महिन्याभरात दहा विहिरी खोदून झाल्यात. अनेकांनी विहीर खोदण्याची तयारी सुरु केली आहे.

ही चंद्रपूर जिल्ह्यातल्या धाबा ग्रामपंचायतेत येणारी बेघर वस्ती आहे. तब्बल पन्नास वर्षांनी इथं विहिरीना पाणी लागलं आहे. धाबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या वस्तीत शासनाने इथं घर बांधून दिलीत. घर बांधायला जागा उपलब्ध करून दिली.मात्र इथं कुणी राहायला तयार नव्हतं. कारण होतं इथं असलेली पाण्याची टंचाई. मात्र काही गरजू परिवार इथं राहायचे. पाण्यासाठी त्यांना मोठं अंतर कपावं लागायचं. साधारणतः वीस वर्षांपूर्वी धाबा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू झाली. अन काही प्रमाणात या वस्तीतील पाणी प्रश्न सुटला आणि वस्ती वाढली. मात्र पाणी पुरवठा योजना महिन्यातून दहा पंधरा दिवस बंद असते.परिणामी या वस्तीत पाणी टंचाई निर्माण होत असते. बैलगाडी, चारचाकी, दुचाकीने विहिरीतील पाणी भरावे लागते. ज्यांच्याकडे साधने नाहीत ते नागरिक सर्व कामे बाजूला ठेवून पाणी भरतात.

प्रशासनाने येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बोअरवेल मारली. मात्र पाणी लागलं नाही. याला वैतागलेल्या एका वस्तीतील कुटुंबाने विहीर खोदली. योगायोगाने त्या विहिरीला पाणी लागलं. विहिरीला पाणी लागलं ही वार्ता वस्तीत विद्युत गतीने पोहोचली. वस्तीला आनंदाचे उधाण आले. आणि मग विहीर खोदण्याची स्पर्धा सुरु झाली. जो तो विहीर खोदू लागला. तब्बल पन्नास वर्षांनी या भागात विहिरीला पाणी लागलं. एका कुटुंबाला पुरेसे पाणी विहिरीत गोळा होत आहे. नळाला कोरड पडलेली असताना विहिरीतील पाणी पुरेसे ठरणारे आहे. पाण्यासाठी कुटुंबाची पायपीट थांबावी यासाठी हातात पैसे नसतानाही उसनवारी करून विहीर खोदण्याला येथील नागरिक प्राधान्य देत आहेत.