चिमुरच्या घोडा यात्रेला उत्साहात प्रारंभ, जगन्नाथ पुरी प्रमाणे हाताने लाकडी रथ ओढण्याची 395 वर्षांची प्रथा

चंद्रपूरचा वडा , ब्रह्मपुरीचा जोडा आणि चिमूरचा घोडा अशी चंद्रपूर जिल्ह्याची प्राचीन ओळख आहे. यातील वडा आणि जोडा काळाच्या ओघात अस्तंगत झाले असले तरी चिमूरचा घोडा अर्थात श्रीहरी बालाजी देवाची वार्षिक घोडा यात्रा आपले अस्तित्व आजही ठळकपणे टिकवून आहे. वसंतपंचमी पासून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात सुरु झालेल्या या यात्रेने 395 वर्षांची दिमाखदार परंपरा पुढच्या पिढीसाठी कायम राखली आहे.

संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असलेल्या चिमुरच्या घोडा यात्रेला वसंतपंचमी पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे चिमुरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची लाकडी घोड्याच्या रथावरून काढण्यात येणारी भव्य मिरवणूक. मोठ्या उत्साहात ही मिरवणूक यात्रा पार पडली. विशेष म्हणजे जगन्नाथ पुरी प्रमाणे इथेही हाताने लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे. मध्यरात्री झालेल्या विशेष पूजेनंतर बालाजीच्या उत्सवमूर्तीला लाकडी रथावर विराजमान करण्यात आलं व त्यानंतर तिची पहाटे 5.30 पर्यंत शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

ही यात्रा पाहण्यासाठी आणि हा रथ ओढण्यासाठी हजारो लोकांनी इथे एकच गर्दी केली होती. साधारण 370 वर्षांपूर्वी चिमूर गावातील भिकाजी पाटील डाहुले या स्थानिक श्रद्धावान व्यक्तीच्या घरी गायीचा गोठा उभारण्यासाठी पायवा खोदला जात असताना त्यांना खोदकामात एक पुरातन बालाजी मूर्ती सापडली. अत्यंत सुबक असणारी ही मूर्ती या श्रद्धाळू व्यक्तीने एका उंच जागी स्थापन करून त्याजागी एक छोटे मंदिर उभारले. दरम्यान या मंदिराची महती व स्वयंभू रूप अनुभवून भक्तांची गर्दी वाढू लागली. जवळ-जवळ तीनशेसत्तर वर्षांपासून सुरु असलेल्या या घोडा-रथ यात्रेला पेशव्यांच्या काळापासून खरी सुरुवात झाली. पेशवाईतल्या साडे तीन शहाण्यांपैकी एक असलेले देवाजीपंत चोरघडे यांनी नागपूरकर भोसलेंच्या मदतीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तेव्हा पासून वार्षिक उत्सव म्हणून या घोडा यात्रेची सुरुवात झाली.

या यात्रेसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील लाखो लोकं चिमूर मध्ये दाखल होतात. तिरुपतीला बोललेला नवस इथे फेडता येत असल्याची लोकमान्यता असल्यामुळे सुध्दा या काळात चिमूर मध्ये लोकांची मोठी गर्दी होते. 1942 ला इंग्रजांविरुध्द झालेल्या चिमूर क्रांती मध्ये सुध्दा या बालाजी मंदिराची भूमिका महत्वाची होती आणि त्यामुळे हे मंदिर आणि यात्रा इतक्या वर्षानंतर सुध्दा लोकांमधलं आपलं स्थान अजूनही कायम ठेवून आहे. मात्र गेल्या काही वर्षात घोडा यात्रेत लोकांचा ओढा कमी होत असल्याचे लक्षात आल्यावर गावातीलच काही लोकांनी या ठिकाणी देशातील प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती तयार करून लोकांना पुन्हा आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. यंदा बालाजी मंदिराच्या आवारात स्थानिक भक्तांनी कलकत्ताची कालीमाता मंदिराची प्रतिकृती निर्माण केली असून ती बघण्यासाठी हजारो भाविक चिमुर येथे दाखल होत आहेत.

15 दिवस चालणा-या या घोडा यात्रेची महाशिवरात्रीच्या दिवशी गोपाळकाला करून उत्सव समाप्ती होते. 15 दिवस चालणा-या या यात्रेत दर्शन, मनोरंजन व शेती व कुटुंबासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी केली जाते.चिमूरला देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मानाचे स्थान आहे. देश स्वतंत्र होण्याआधी चिमूरच्या क्रांतिकारकांनी इंग्रजांची सत्ता उलथवून भारतीय ध्वज फडकाविला. या घटनेची घोषणा बर्लिन रेडीओवरून झाली होती. अशा ऐतिहासिक चिमूर नगरीत बालाजीचे स्थान या शहराला व पर्यायाने जिल्ह्याला धार्मिक पर्यटनाची नवी उंची देऊन जाते.